४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 05:56 IST2026-01-09T05:56:05+5:302026-01-09T05:56:05+5:30
बहुतांश उमेदवारांनी आपला पारंपरिक व्यवसाय नमूद केला आहे. यात शिलाई कामगारांपासून मासे विक्रेत्यांपर्यंत अनेक जण निवडणूक रिंगणात आहेत.

४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांतून त्यांच्या शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांत राजकारण आणि समाजकारण यांची सरमिसळ होत असल्याची चर्चा होत असतानाच, यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील केवळ चार उमेदवारांनीच व्यवसायाच्या रकान्यात ‘समाजसेवा’ किंवा ‘सामाजिक कार्य’ असा उल्लेख केला आहे.
बहुतांश उमेदवारांनी आपला पारंपरिक व्यवसाय नमूद केला आहे. यात शिलाई कामगारांपासून मासे विक्रेत्यांपर्यंत अनेक जण निवडणूक रिंगणात आहेत.
भाजपचे योगेश वर्मा, प्रीती साटम आणि योगीराज दाभाडकर, तसेच कुख्यात गुंड अरुण गवळी यांची वाहिनी आणि शिंदेसेनेच्या उमेदवार वंदना गवळी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात व्यवसाय म्हणून समाजसेवा नमूद केली आहे. मात्र भाजपच्या प्रभाग ४९ मधील उमेदवार सुमित्रा म्हात्रे आणि शिंदेसेनेच्या प्रभाग १४२ मधील उमेदवार अपेक्षा खांडेकर यांनी सामाजिक कार्य विषयात पदवी घेतलेली असतानाही व्यवसायाच्या रकान्यात ‘नोकरी’ असा उल्लेख केला आहे.
भाजपच्या प्रभाग १५० मधील उमेदवार वनिता कोकरे या जेवणाचे डबे पुरवण्याचा व्यवसाय करतात. विशेष म्हणजे काही उमेदवार व्यवसायामुळे लक्ष वेधून घेत आहेत. प्रभाग १८७ मधील शिंदेसेनेचे उमेदवार शेख वकील हे शिलाई कामगार आहेत. प्रभाग ४८ मधील सलमा अलमेलकर या मासे विक्रेता आहेत.