२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 10:19 IST2026-01-11T10:17:12+5:302026-01-11T10:19:24+5:30
Shiv Sena Shinde Group Rahul Shewale: मतदारांनी पुन्हा महायुतीवर विश्वास का ठेवावा? या प्रश्नावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सूचक उत्तर दिले.

२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
Shiv Sena Shinde Group Rahul Shewale: राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याभरात प्रचाराला वेग आला आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वच पक्ष अगदी जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. नेमकी कोणी कुठे आणि कशी युती किंवा आघाडी केली आहे, यावरूनही संमिश्र वातावरण आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुलाखती, प्रचार दौरे, सभांची संख्या वाढली आहे. अशातच मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत शिंदेसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या उत्तरामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठीच चुरस पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधू एकत्र आले असून, भाजपा-शिंदेसेनेसाठी हे तगडे आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे बंधू आणि भाजपा-शिंदेसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनल्याचे म्हटले जात आहे. यातच गेली २५ वर्षे सत्तेत असूनही मुंबईकरांचे मूलभूत प्रश्नही अजूनही सुटलेले नाही, असे असताना महायुतीवर मतदारांनी विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांना विचारण्यात आला.
२५ वर्षे महापालिकेवर सत्ता असूनही मुलभूत प्रश्न सुटले नाहीत. मतदारांनी पुन्हा महायुतीवर विश्वास का ठेवावा?
लोकमत मुलाखतीत राहुल शेवाळे यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, मुंबई महापालिकेत आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत होतो, हे खरे आहे. मात्र, त्या काळात केंद्र आणि राज्य सरकारचे अपेक्षित सहकार्य वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे अनेक धोरणात्मक निर्णय अडकले. सर्वांत मोठी चूक म्हणजे विकास नियोजन आराखड्याची (डीपी) प्रभावी अंमलबजावणी न होणे. सध्या या आराखड्याची केवळ ९ टक्केच अंमलबजावणी झाली. आता २०३४ पर्यंतच्या प्रस्तावित डीपीची पूर्ण आणि काटेकोर अंमलबजावणी करणे हे आमचे प्राधान्य आहे. नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन्ही महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता प्रत्यक्ष मार्गी लागत आहेत. बीडीडी चाळींचा पुनर्विकास असो, धारावी पुनर्वसन असो, 'म्हाडा'च्या इमारती किंवा पागडी पद्धतीच्या जुन्या चाळी या सगळ्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जात आहेत. यामुळे मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत परत येईल आणि शहरातील मराठी भाषिकांचा टक्का वाढेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या 'खऱ्या' वारसावरून सुरू असलेली राजकीय धुसफूस अधिक तीव्र होत आहे. मराठी मतदारांचा खरा कौल आमच्याच बाजूने असल्याचा दावा करत शिंदेसेनेचे सरचिटणीस व माजी खासदार राहुल शेवाळे आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या लढाईत राहुल शेवाळेंनी उद्धवसेना आणि भाजपा दोघांनाही थेट आव्हान दिले आहे.