BMC Election 2021: मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत महत्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 15:20 IST2021-05-28T15:20:03+5:302021-05-28T15:20:33+5:30
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणं अपेक्षित आहे.

BMC Election 2021: मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत महत्वाची बैठक
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणं अपेक्षित आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक नेमकी कशी घेतली जाणार? ती पुढे ढकलली जाणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू.पी.एस.मदान यांची मुंबई महापालिकेच्या आधिकाऱ्यांसोबत बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
महापालिका निवडणुकीसाठी गेल्या वर्षीपासूनच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनपाच्या चाव्या काबिज करण्याचा भाजपचा मनसुबा आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणूक वेळेवर होणार की कोरोनामुळे तिला मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली जाणार याची उत्सुकता आहे. (BMC Election 2021 Maharashtra State Election Commissioner UPS Madan to meet Mumbai Mahapalika Officials)
मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले होते. मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. पालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. निवडणुकीसाठी जवळपास ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. पण सध्याची कोविड परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन त्याची आतापासूनच तयारी करण्यास पालिकेनं सुरूवात केली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांचे आकडे आता हळूहळू कमी होत आहेत. पण तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती बिकट झाल्यास पालिका निवडणूक वेळेत होणार की पुढे ढकलली जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाच्या अध्यक्षांसोबतच्या आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.