या प्रश्नांची उत्तरे तर मलाही देता येणार नाहीत; मुख्यमंत्र्यांकडून सफाई कामगारपदासाठीची परीक्षा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 18:20 IST2018-03-20T18:20:10+5:302018-03-20T18:20:10+5:30
गेल्या काही दिवसांपासून सफाई कामगार पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नांच्या काठीण्य पातळीवरून मोठा वाद सुरू आहे.

या प्रश्नांची उत्तरे तर मलाही देता येणार नाहीत; मुख्यमंत्र्यांकडून सफाई कामगारपदासाठीची परीक्षा रद्द
मुंबई: महानगरपालिकेतील सफाई कामगार पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पालिका आयुक्तांना दिले.
गेल्या काही दिवसांपासून सफाई कामगार पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नांच्या काठीण्य पातळीवरून मोठा वाद सुरू आहे. दहावी पास अशी शिक्षणाची अट असलेल्या या परीक्षेत विचारलेले प्रश्न ऐकून अनेकजण चक्रावून गेले होते. या प्रकरणी भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्नपत्रिकांचे संच दाखवले. हे प्रश्न पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले आणि हसायला लागले. यापैकी काही प्रश्नांची उत्तरे मलाही येत नाहीत, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सफाई कामगार पदासाठी घेण्यात आलेली परीक्षाच रद्द करण्याचे लेखी निर्देश पालिका आयुक्तांना दिले.
मुंबई महापालिकेने 1388 सफाई कामगारांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी सफाई कामगार पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
सफाई कामगार भरतीसाठी विचारलेले प्रश्न
भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण?
88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?
फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील परागकणांच्या होणाऱ्या परागसिंचनास काय म्हणतात?
गायनेशियम म्हणजे काय?
लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगर मध्ये काय असते?
सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे ?
निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे 2000 आणि 2750 गुंतवणूक करुन एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला. त्यांच्या परिणामी 12 महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये 12:11 या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती.
72 कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी 6 सेकंदात 1 पोल ओलांडते. ही आगगाडी 480 मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल?