लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी मोठा अडथळा निर्माण होणार असून, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेतला जात असून, तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आहे. विशेषतः पश्चिम रेल्वेवर सर्वाधिक फटका बसणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०:१४ ते दुपारी ३:३२ दरम्यान सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर या कालावधीत लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही.
ट्रान्स-हार्बर बंद; तर पश्चिम रेल्वेवर सुमारे ३०० लोकल रद्द
ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० या वेळेत दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, ठाणे-वाशी/नेरुळ-पनवेल दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरीवली दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर १९ तासांचा ब्लॉक आहे. शनिवार रात्री १०:३० ते रविवारी सायंकाळी ७:३० या कालावधीत पूल क्रमांक ६१ च्या ‘री-गर्डरिंग’च्या कामासाठी हा ब्लॉक असेल. यामुळे शनिवारी ४५ तर रविवारी २५४ अशा ३०० लोकल रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय, बोरिवली स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वरून वाहतूक केली जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
Web Summary : Mumbai local train services face major disruption Sunday due to maintenance work on Central, Harbour, and Western lines. Approximately 300 Western Railway locals are cancelled. Passengers are advised to plan alternate routes.
Web Summary : मुंबई लोकल ट्रेन सेवाएं रविवार को मध्य, हार्बर और पश्चिमी लाइनों पर रखरखाव के काम के कारण बाधित रहेंगी। लगभग 300 पश्चिमी रेलवे लोकल रद्द हैं। यात्रियों को वैकल्पिक मार्गों की योजना बनाने की सलाह दी जाती है।