युद्धनौकेच्या ‘एसी’मध्ये स्फोट झाल्याची शक्यता; ११ जखमींची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:16 AM2022-01-20T07:16:09+5:302022-01-20T07:16:33+5:30

सर्व अकरा जणांच्या जीवाचा धोका टळला आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. 

Blast in AC compartment of INS Ranvir led to death of 3 sailors | युद्धनौकेच्या ‘एसी’मध्ये स्फोट झाल्याची शक्यता; ११ जखमींची प्रकृती स्थिर

युद्धनौकेच्या ‘एसी’मध्ये स्फोट झाल्याची शक्यता; ११ जखमींची प्रकृती स्थिर

Next

मुंबई : नौदलाच्या ताफ्यातील ‘आयएनएस रणवीर’वर मंगळवारी झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या अकरा जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युद्धनौकेवरील वातानुकूलन संयंत्रात स्फोट झाला असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 
नौदलाच्या ताफ्यातील विनाशिका ‘रणवीर’वर झालेल्या स्फोटात तीन अधिकारी मृत्युमुखी पडले होते. तर, अकराजण जखमी झाले होते. यापूर्वी झालेल्या अशा अपघातांत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झालेली असल्याने जखमींच्या प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत होती. आता या सर्व अकरा जणांच्या जीवाचा धोका टळला आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. 

युद्धनौकेवरील बाॅयलरचा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, नौदलातील सूत्रांनी ही शक्यता फेटाळली आहे. युद्धनौकेवरील वातानुकूलन संयंत्रात स्फोट झाल्याने विषारी वायूंचा दाब वाढला. या स्फोटामुळे संयंत्रावरील वरच्या मजल्याला धक्का बसून या मजल्यावर कार्यरत अधिकारी व खलाशांना फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले. हा सर्व भाग विनाशिकेच्या शस्त्रास्त्र भंडारापासून दूर असल्याने मोठा धोका टळला. तीन महिन्यांची मोहीम यशस्वी करून विनाशिका मुंबईत नौदल गोदीत दाखल झाली होती. आठवडाभरात ती मूळ ताफ्यात परतणार होती. त्यासाठीचे काम सुरू होते. स्फोट झाला नसता तर जानेवारी महिना अखेरपर्यंत ही विनाशिका विशाखापट्टणमला पोहचली असती.

मृत अधिकाऱ्यांची नावे 
किशन कुमार (४७ वर्षे), मास्टर चीफ, पेटी ऑफिसर १-  पानिपत, हरियाणा
सुरिंदर सिंग (४८ वर्षे), मास्टर चीफ, पेटी ऑफिसर २ - हमीरपूर, हिमाचल प्रदेश
अरविंद कुमार सिंग (३८ वर्षे), मास्टर चीफ, पेटी ऑफिसर २- सरन, बिहार 
नौदलातील मास्टर चीफ, पेटी ऑफिसर १ हे पद लष्करातील सुभेदार मेजर पदाच्या समकक्ष आहे. तर, मास्टर चीफ, पेटी ऑफिसर २ हे सुभेदार दर्जाचे आहे.
आयएनएस रणवीर ही नौदलाच्या पूर्व विभागाच्या ताफ्यातील विनाशिका आहे. तीन महिन्यांच्या आंतरतटीय मोहिमेसाठी ती पश्चिम विभागात आली होती. 
 

Web Title: Blast in AC compartment of INS Ranvir led to death of 3 sailors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.