गोवंडी येथे एलपीजी गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघडकीस; टेम्पोसह सिलिंडर जप्त, देवनार पोलिसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:25 IST2026-03-17T13:24:50+5:302026-03-17T13:25:25+5:30
मुंबई : शहरात गॅसटंचाईमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असतानाच गोवंडी परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा ...

गोवंडी येथे एलपीजी गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघडकीस; टेम्पोसह सिलिंडर जप्त, देवनार पोलिसांत गुन्हा
मुंबई : शहरात गॅसटंचाईमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असतानाच गोवंडी परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा आणि काळाबाजार उघडकीस आला आहे. नागरी पुरवठा विभागाच्या पथकाने या कारवाईत तीन सिलिंडर व टेम्पो, असा ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी मोहम्मद फारुक शेख, टेम्पोच्या अज्ञात मालक-चालकाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि एलपीजी (पुरवठा व वितरण नियंत्रण) आदेश २००० अंतर्गत देवनार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नागरी पुरवठा विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, १४ मार्चला दुपारी सुमारे ३ वाजता शिधावाटप अधिकारी जगन्नाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप निरीक्षक व अधिकारी पथकाने गोवंडी पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानासमोर, वीर जिजामाता भोसले मार्गावर छापा टाकला.
हॉटेल व्यावसायिकांना ३,३०० रुपयांना विक्री
पोलिस व पंचांनी टेम्पोचा दरवाजा उघडला असता त्यात २१ किलो वजनाचा भरलेला एक व्यावसायिक गॅस सिलिंडर, १९ किलोचे दोन रिकामे सिलिंडर आढळले.
यावेळी तेथे आलेल्या मोहम्मद फारुक शेख याने हे सिलिंडर गॅस एजन्सीकडून ३,१०० रुपयांना खरेदी करून हॉटेल व्यावसायिकांना ३,३०० रुपयांना विकत असल्याची कबुली दिली. प्रत्येक सिलिंडरमागे २०० रुपयांचे कमिशन मिळत असल्याचेही त्याने सांगितले.
नियंत्रण कक्षाशी संपर्क
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला कुलूप होते. वाहनचालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद होता. पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देताच शिवाजीनगर व देवनार पोलिस तेथे दाखल झाले.