BKC will tuch the sky, 25-storey buildings have been cleared | बीकेसी आभाळाला भिडणार, २५ मजली इमारतींचा मार्ग झाला मोकळा

बीकेसी आभाळाला भिडणार, २५ मजली इमारतींचा मार्ग झाला मोकळा

मुंबई : वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्समधील (बीकेसी) आर्थिक केंद्राच्या पुनर्विकासाला मंगळवारी एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ई ब्लॉकमधील १० मजली इमारतींच्या जागी २५ मजली गगनचुंबी टॉवर्स उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईतील आर्थिक केंद्राच्या सीमा आणखी विस्तारणार आहेत.
बीकेसी आठ ब्लॉकमध्ये विभागलेली असून त्याचे एकूण क्षेत्रफळ ३७० हेक्टर आहे. मात्र, यापैकी केवळ ई, एफ आणि जी ब्लॉकचा विकास तूर्त शक्य आहे. एफ ब्लॉकमध्ये खारफुटी आणि मिठी नदीचे पात्र असल्याने तिथल्या विकासावर मर्यादा आहे. एमएमआरडीएची सारी भिस्त ई आणि जी ब्लॉकवरच आहे. ई ब्लॉकचे क्षेत्रफळ १ लाख ९६ हजार चौरस मीटर आहे. त्यात व्यावसायिक (६७ हजार ९२ चौरस मीटर) आणि निवासी (१६ हजार ९२ चौरस मीटर) जागांचा समावेश आहे. तर, सामाजिक सुविधा (०.०४ हेक्टर), क्रीडांगणे (३.२९ हेक्टर), वनीकरण (१.२७ हेक्टर) आणि रस्त्यांसाठी (६.७१ हेक्टर) जागा उपलब्ध आहे.
गेल्या दोन-तीन दशकांत या भागात २८ व्यावसायिक आणि १० निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी बांधकामांच्या उंचीवर ४० मीटर्सचे बंधन असल्याने इथल्या इमारती १० मजल्यांपेक्षा कमी उंचीच्या आहेत. मात्र, नव्या पुनर्विकास प्रस्तावानुसार या भागात ग्लोबल एफएसआयनुसार बांधकाम परवानग्या दिल्या जाणार आहेत. यात रस्ते आणि मोकळ्या जागांचा एफएसआय वापरण्याचीसुद्धा मुभा आहे. त्यामुळे ८० मीटर्स म्हणजेच २५ मजल्यांपर्यंतच्या इमारतींचे बांधकाम इथे शक्य होईल, अशी माहिती एमएमआरडीएतल्या सूत्रांनी दिली.
या पुनर्विकासाचा अर्बन डिझाईन मास्टर प्लॅन आणि आर्किटेक्चर कंट्रोल करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती ई निविदेद्वारे केली जाईल. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाची दिशा ठरेल. ई ब्लॉकमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त बांधकाम क्षेत्राची मागणी झाल्यानंतर प्राधिकरणाच्या उत्पन्नात वाढ होईल याची खात्री केली जाईल. त्यानंतरच प्राधिकरणाची मंजुरी घेऊनच पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हाँगकाँग मॉडेलनुसार पुनर्विकास

या पुनर्विकासासाठी एक विस्तृृत मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. गगनचुंबी इमारती उभारताना तिथे स्काय गार्डन, जमिनीवर पाय न ठेवता एका इमारतीतून दुसºया इमारतीत जाण्यासाठी तरंगते पदपथ, मनोरंजनाची ठिकाणे, आयकॉनिक ब्रिज, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानांची उभारणी येथे केली जाणार आहे.
हाँगकाँग शहरातील आर्थिक केंद्राच्या धर्तीवर हा विकास करण्याचे एमएमआरडीएचा मानस आहे.

एफएसआयमधून
१८ हजार कोटी उत्पन्न
मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक, उड्डाणपूल आदी कामांसाठी एमएमआरडीएला पुढील ७ ते ८ वर्षांत एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बीकेसी ई ब्लॉकच्या पुनर्विकासासाठी जो वाढीव एफएसआय दिला जाणार आहे त्यातून सुमारे १८ हजार कोटी रुपये मिळू शकतील असा अंदाज आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BKC will tuch the sky, 25-storey buildings have been cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.