Join us  

'राजकीय फायद्यासाठी देशाचे भविष्य उध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 7:17 PM

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या  हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत.

मुंबई - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून विद्यार्थी तसेच शिक्षकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांच्या पाठिमागे कोणाचे हात आहेत? हे स्पष्ट दिसत असून सत्तापिपासू भाजपा आता रक्तपिपासू झाला आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

जेएनयू हल्ला प्रकरणावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सत्तेसाठी राक्षसी प्रवृत्ती असलेला भाजपा आता देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत आहे. हा लोकशाही व संविधानावर करण्यात आलेला हल्ला असून ही बाब गंभीर तसेच चिंताजनक आहे. रात्रीच्या अंधारात हल्ला करून भाजपा विद्यार्थ्यांचाही आवाज दाबण्याचा तसेच त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे पण काँग्रेस पक्ष या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच भाजप विद्यार्थी संघटनेच्या गुंडानी हा हल्ला केला त्यावेळी पोलीसांनीही बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत असून सरकारच्या पाठिंब्याशिवाय असा हल्ला होणे शक्य नाही. काँग्रेस पक्ष अशा हिंसक कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.  

दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी पंधरा दिवसापूर्वी अमानुष मारहाण केली होती. विद्यापीठ परिसरात घुसून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणे ही हुकूमशाही प्रवृत्तीच आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी देशाचे भविष्य उध्वस्त करण्याचा भाजपाचा हा डाव असून यात त्यांना यश येणार नाही, असा टोलाही थोरातांनी केंद्र सरकारला लगावला. 

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या  हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते, मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही झालेल्या प्रकारावर टीका केली आहे. राहुल गांधी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनीसुद्धा या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.   

टॅग्स :बाळासाहेब थोरातजेएनयूभाजपाकाँग्रेस