Join us

'महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही',नाना पटोलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 16:46 IST

Mahavikas Aghadi Maha Morcha: स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पहात असून आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाचा प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पहात असून आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. 

महाविकास आघाडीने रिचर्डसन अँड कृडास कंपनी, नागपाडापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांच्यासह मविआचे सर्व घटक पक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीही मोर्चाला संबोधित केले.

नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करण्याचे काम राज भवनातून भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून सुरु झाले आणि नंतर भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने तेच काम सुरु ठेवले. भाजपा नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहेत यावर जनतेत प्रचंड चीड आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिक्षण संस्थांसाठी भीक मागितली असे उद्गार काढून महापुरुषांच्या अपमानाचा कळसच गाठला.  

टॅग्स :नाना पटोलेमहाविकास आघाडीमुंबई