मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने पक्ष बांधणी हाती घेतली आहे. विधानसभानिहाय पक्षाच्या बैठका घेण्यात येत आहेत. तरुण कार्यकर्त्यांना पद मिळावे यासाठी दोन वॉर्डासाठी एक मंडल अध्यक्षपद निर्माण करण्यात येणार आहे. ४५ वर्षाखालील तरुणांची त्यासाठी निवड करण्यात येईल, असे सूत्रांनी 'लोकमत'ला सांगितले.
यावेळी जागा वाटपात भाजपला २०१७ च्या तुलनेत कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना पदाधिकारी बनवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
सध्याच्या पदाधिकारी संख्येनुसार अन्य कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करणे शक्य होणार नाही. यासाठी मंडळ अध्यक्षपद वाढविण्यात येणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी यापूर्वी एक मंडळ अध्यक्ष होता. त्यात वाढ करून दोन वॉर्डासाठी एक याप्रमाणे विधानसभेसाठी वॉर्डनिहाय तीन मंडळ अध्यक्ष दिले जाणार आहेत. ४५ वर्षावरील मंडल अध्यक्षांना बदलून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.