Join us  

भाजपा लवकरच काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला मोठा पक्ष बनेल- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 7:58 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये होत असलेल्या इनकमिंगवर टीका केली आहे.

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये होत असलेल्या इनकमिंगवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेनं आता सामनाच्या अग्रलेखातून घराणेशाहीवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. आपली माणसे आणि मूळ विचारच खरा. तरीही तरुण तडफदार सुजय विखे-पाटील यांच्या नव्या कारकीर्दीस आम्ही शुभेच्छा देत आहोत. तुम्ही आलात, आनंद आहे. विखे-पाटील घराण्याप्रमाणे मोठी राजकीय घराणी भाजपच्या गळाला लागतील व भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष बनेल, असं मतही सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे. सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. वडिलांच्या, कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाऊन आपण हा निर्णय घेतल्याचे छोट्या विखे-पाटलांनी जाहीर केले. 

- चिरंजीव विखे-पाटलांना पडेल ती किंमत देऊन खासदार व्हायचेच आहे व आल्या आल्या त्यांना नगरमधून भाजपची उमेदवारी मिळेल असे संकेत आहेत. सुजय यांच्यामुळे भाजप पॉवरफुल झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. - सुजयपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादी वगैरे पक्षांतील अनेकजण भाजपच्या दारात रांगा लावून उभे आहेत व त्याचा आनंद मुख्यमंत्री व इतर मंडळींच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यात चंद्रकांतदादा पाटील यांनी अशीही घोषणा केली आहे की, राज्यात सात-आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होईल. - चंद्रकांत पाटील यांच्या या संभाव्य भूकंपाच्या घोषणेनंतर राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन सतर्क झाले असेल. या भूकंपाचा केंद्रबिंदू नक्की कुठे आहे, भूगर्भातील हालचाली कुठे व कशा सुरू आहेत याचा अंदाज येत्या काही दिवसांत येईल. - विखे-पाटील घराण्याप्रमाणे मोठी राजकीय घराणी भाजपच्या गळाला लागतील व भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष बनेल. त्या दिशेने हिंदुत्ववादी विचाराचे धुरीण कामास लागले आहेत.- दरम्यान अकलूजच्या मोहिते-पाटलांची धाकटी पाती रणजितसिंह हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी भाजपच्या मंत्र्यांना भेटले व हे घराणेसुद्धा भाजपच्या जाळय़ात फसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. - काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना घेऊनच हिंदुत्ववादी पक्षांना पुढे जायचे असेल तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचे? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. - भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. - काँग्रेस संस्कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी कालच टीका केली आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे एकमेकांना पर्यायी शब्द असल्याचे मोदी यांचे म्हणणे आहे. - दुसरे असे की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘इनकमिंग’ आज आपल्या घरात लाभदायक वाटत असले तरी नंतर ते तापदायक ठरू शकते, याचा अनुभव आम्ही घेतला आहे. सत्ता आहे म्हणून आज लोक येतात व सत्ता जाताच दुसरा घरोबा शोधतात. - आज शिवसेनेवर टीका करणारे राधाकृष्ण विखे-पाटील कधीकाळी शिवसेनेत होते व पितापुत्रांना एकाच वेळी केंद्रात व महाराष्ट्रात मंत्रीपदे फक्त शिवसेनेनेच दिली होती, पण युतीची सत्ता जाताच त्यांनी पलटी मारली. - राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते असतानाही कधी विरोधी पक्षनेत्यासारखे वागले नाहीत. शिवसेनेने जेवढा ताठ बाणा सत्तेत राहूनही दाखवला त्याच्या कणभरही त्यांनी दाखवला नाही. - उलट सत्तेत राहून विरोध करता म्हणून शिवसेनेकडे राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विखे-पाटलांवर आता नैतिकतेच्या मुद्द्यांवर राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे. - ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. ही काही संगीत किंवा गायकीची घराणी नव्हंत. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी. - उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मूळ विचारच खरा. तात्पुरती सूज काय कामाची?-  तरीही तरुण तडफदार सुजय विखे-पाटील यांच्या नव्या कारकीर्दीस आम्ही शुभेच्छा देत आहोत. तुम्ही आलात, आनंद आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपा