Join us  

मुंबईत भाजपा पोहोचणार १० लाख गरजूंपर्यंत; अन्न-औषध वितरणाला प्राधान्य- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 2:24 AM

मुंबई प्रदेश भाजपाचे जिल्हा अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आणि भाजपाच्या सर्व नगरसेवकांसोबत संवादसेतूच्या माध्यमातून फडणवीस यांनी संवाद साधला.

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण लॉकडाऊन सुरू असताना एकट्या मुंबई महानगरातील १० लाख गरजूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार आज मुंबई भाजपाने केला. ही मदत करताना अन्न आणि औषधी याला सर्वोच्च प्राधान्य द्या, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई प्रदेश भाजपाचे जिल्हा अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आणि भाजपाच्या सर्व नगरसेवकांसोबत संवादसेतूच्या माध्यमातून फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर आदी सहभागी झाले होते.

फडणवीस म्हणाले की, जरी नगरसेवकांनी प्रत्येक वॉर्डात विशेष जबाबदारी घ्यायची आहे. आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात प्रत्येकाला मिळतील, हे त्यांनी सुनिश्चित करायचे आहे. मुंबईत रेल्वेस्थानकालगत किंवा पुलांखाली अनेक लोक राहतात. त्यांची संख्या मोठी आहे. आसपासच्या परिसरातील आदिवासी पाडे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचा. मुंबईतील विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवकांनी जनता किचनच्या माध्यमातून गरजूंना भोजन, भाजीविक्रेते आणि गृहनिर्माण सोसायट्याना सॅनेटाईझरआणि मास्कवाटप उपक्रम सुरू असे केले आहेत. त्याबाबतचे अनुभव आणि अडचणी यावर चर्चा झाली.

फडणवीस यांनी आज राज्यातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जेथे भाजपा आमदार नाहीत, अशा विधानसभांतील प्रभारींशी संवाद साधला. या संवादातून अनेक जिल्ह्यांमध्ये अन्य ठिकाणांचे लोक अडकले आहेत, हा एक मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. देशात सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांची आहे तेथेच सेवा करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

भाजपातर्फे हाती घेण्यात आलेले सेवाकार्य आता तालुका पातळीपर्यंत नेण्यात येणार आहे. अनेक उपक्रम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले आहेत. घरपोच औषधी, रक्तदानाच्या उपक्रमात सहभाग, जिल्ह्यांच्या स्वतंत्र हेल्पलाईन, मास्क वितरण असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या