यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईचे महापौरपद आपल्याकडेच पाहिजे, त्यावर तडजोड होऊ शकत नाही अशी भूमिका घ्या, असे निर्देश भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
प्रदीर्घ प्रतीक्षा आणि संघर्षानंतर आपल्याला मुंबई महापालिकेत मोठे यश मिळाले आहे. ८९ जागा जिंकल्यामुळे महापौर पदावर आपलाच हक्क आहे, ही भूमिका मित्रपक्ष शिंदेसेनेसमोर मांडा. हे करताना कोणतीही कटुता येणार नाही याचीही दक्षता घ्या, असे पक्षनेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
महापौरपद आपल्याकडेच यायला हवे ही मुंबईतील कार्यकर्त्यांची भावना असून त्या भावनेचा सन्मान करायचा आहे. नेमके हेच मित्रपक्षाला सांगा. त्याचवेळी मुंबई पालिकेतील अन्य पदे आणि अन्य महापालिकांमधील पदांबाबत शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याशी सन्मानजनक तोडगा काढा, असेही नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबईच्या महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीस आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त निराधार असल्याचे खा. संजय राऊत यांनी सोमवारी स्पष्ट केले.
इतक्या संघर्षानंतर यश मिळाले, महापौरपद आपल्याकडेच हवे
२०२२ मध्ये राज्यात अचानक सत्तांतर झाले, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले. शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार त्यांच्यासोबत होते. त्यावेळी भाजपचे १०६ आमदार होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असे मानले जात असतानाच शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले. २०२४ मध्ये महायुतीला दणदणीत यश मिळाले. भाजपला १३२ जागा मिळाल्या, ५ अपक्षांनी पाठिंबा दिला. तेव्हा भाजपने मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहील, असे स्पष्ट करत फडणवीस यांना संधी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष संघटनेत महाराष्ट्राशी संबंधित पदांवर असलेल्या नेत्यांशी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. इतक्या संघर्षानंतर यश मिळालेले असताना महापौरपद आपल्याकडेच असायला हवे, ही मुंबईतील हजारो कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा असल्याची भावना फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या कानी घातली आहे आणि त्याला केंद्रीय नेतृत्वानेही तसाच सकारात्मक प्रतिसाद दिला.
ठाण्याचे महापौरपद भाजपला २ वर्षे हवे!
- शिंदेसेनेने ७५ जागा जिंकत पुन्हा ठाण्यात वर्चस्व सिद्ध केले आहे; मात्र युतीत लढलेल्या भाजपला २८ जागा मिळाल्यानंतर दोन वर्षांसाठी महापौरपद हवे आहे. तशी इच्छा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे. शिंदेसेनेने महापौरपदावर दावा सांगताच भाजपही आक्रमक झाला आहे. त्यामुळे मुंबईनंतर ठाण्यातही महापौरपदासाठी रस्सीखेच होईल, अशी चर्चा आहे.
- आ. निरंजन डावखरे यांनी उघडपणे महापौरपदावर दावा करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आश्वासनपूर्तीसाठी भाजपकडे महापौरपद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास भाजप चौकीदाराची भूमिका बजावेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
शिंदेसेनेची सावध प्रतिक्रिया
भाजपच्या भूमिकेवर शिंदेसेनेने सावध प्रतिक्रिया दिली आहे. निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील, असे शिंदेसेनेचे नेते खा. नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, डावखरेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना अधिकाधिक पदे मिळावीत, यासाठी ही मागणी केली आहे. महापौर आमचाच असेल, मात्र भाजपचा महापौर होईल का?, याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल.
Web Summary : BJP insists on Mumbai's mayor post after significant gains. Central leadership instructed state leaders to claim the position, prioritizing party worker sentiment. Discussions with Shinde's Sena regarding other positions are ongoing. BJP also eyes Thane's mayor post for two years.
Web Summary : भाजपा मुंबई के महापौर पद पर अड़ी, समझौता नहीं करेगी। केंद्रीय नेतृत्व ने राज्य के नेताओं को पद का दावा करने का निर्देश दिया, कार्यकर्ता भावनाओं को प्राथमिकता दी। शिंदे सेना के साथ अन्य पदों पर चर्चा जारी है। भाजपा की नजर ठाणे के महापौर पद पर भी।