Join us  

BJP vs Shivsena: "आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या..."; भाजपाची शिवसेनेवर खरमरीत टीका; टीपू सुलतान नामकरणाचा वाद पेटण्याची चिन्हं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 12:21 PM

टिपू सुलतानचं नाव मुंबईतील एका क्रीडा संकुलाला देण्यावरून सध्या भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना सुरू आहे.

भाजपा आणि शिवसेना यांची २५ वर्षांची युती तुटली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकांच्या निकालाअंती शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासमवेत एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापित केलं. भाजपा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला पण त्यांना सत्तास्थापन करता आली नाही. महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्या कायम टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप सुरू असतात. शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची संधी भाजपचे नेतेमंडळी अजिबात सोडत नाही. नुकताच मुंबईतील एका नामांतराचा विषय चर्चेत आहे. टीपू सुलतानचे नाव एका उद्यानाला दिलं जावं असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु, भाजपाचा या गोष्टीला विरोध आहे. याच मुद्द्यावरून आज भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर अतिशय शेलक्या शब्दात टीका केली.

"ही तर संधीसाधू सेना… कॉंग्रेसने जन्माला घातली, मुस्लिम लीगच्या मांडीवर बसली, कॉंग्रेस (ओ) सोबत रमली, कॉंग्रेस (I) शी दोस्ती केली, पीएसपीशी गाठ बांधली, आणि सारे फसल्यावर हिंदुत्वाचा घोष करीत भाजपसोबत आली… आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना! औरंगाबादचे संभाजीनगर करणं जमत नाही. हिंदुत्व फक्त गप्पापुरतं राहिलं. १९७० मध्ये मुस्लिम लीग सोबत गेले, आता टीपू सुलतान उद्घघोष करत आहेत", असं ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली.

नक्की काय आहे टीपू सुलतान-नामकरण वाद?

मुंबईतील मालाडच्या एका क्रीडा संकुलाला टीपू सुलतानचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नामकरणावरून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरू आहे. भाजपा आणि बजरंग दल यांनी या नावाला विरोध केला असून 'हिंदूंची कत्तल करणाऱ्याचे नाव देऊ नये' असं रोखठोक मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. याच मुद्द्यावरून प्रजासत्ताक दिनी भाजपाने मालाडमधील क्रीडा संकुलासमोर आंदोलनही केलं. यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या मुद्द्यावर, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांना विचारले असता, हे आंदोलन भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलं आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, भाजपाच्या नगरसेवकाने 'वीर टिपू सुलतान' असं एका रस्त्याचं नामकरण केल्याचा दावा करत त्याच्यावर भाजपा काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :भाजपाशिवसेनाउद्धव ठाकरे