Join us  

भाजपने १४५ चा दावा करावा, शिवसेनेनं दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 5:04 AM

शिवसेनेने दिले आव्हान : राज्यपालांसमोर सिद्ध करावे बहुमत

मुंबई: भाजपचे नेते गुरुवारी राज्यपालांना भेटणार आहेतच तर त्यांनी भाजपला १४५ आमदारांचा पाठिंबा असून बहुमत त्यांच्याकडे असल्याचे राज्यपालांसमोर सिद्ध करावे, असे आव्हान शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी यांनी दिले. आम्ही याच क्षणाची वाट पाहत होतो. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा, असे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतो, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल ही गोड बातमी सुधीर मुनगंटीवार लवकरच देतील असा चिमटा राऊत यांनी काढला. महायुतीच्या सरकारबाबत गोड बातमी लवकरच समजेल, असे विधान मुनगंटीवार यांनी तत्पूर्वी केले होते. तर, शरद पवार यांनी त्यांचा पक्ष विरोधी पक्षात बसेल, असे जाहीर करण्याच्या काही मिनिटे आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आमची चर्चा झाली असे राऊत म्हणाले.

शिवसेनेचा दबाव की...अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची व अधिक मंत्रिपदे पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेने भाजपवर दबाव वाढविला आहे. त्या दबावाचाच एक भाग म्हणून शिवसेनेकडून ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. राष्ट्रवादीने आधीच ते विरोधी पक्षात बसणार असे जाहीर केले आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याची कोणतीही भूमिका काँग्रेसने अद्याप घेतलेली नाही.भाजप नेते राज्यपालांना भेटणारभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार हे गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती देण्यासाठी ही भेट असेल असे मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सांगितले.‘अवकाळी’मुळे ‘वानखेडे’चा पर्याय रद्द!मुंबई : भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यास नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमऐवजी राजभवनात होणार आहे. राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केवळ भाजपच्या मंत्र्यांनी ३१ आॅक्टोबरला शपथ घेतली होती. मात्र, त्याचा भव्य समारंभ वानखेडे स्टेडियमवर झाला होता. त्यावेळी भाजप-शिवसेना वेगवेगळे लढले होते आणि शिवसेना नंतर सत्तेत सहभागी झाली होती. यावेळी भाजप-शिवसेना एकत्र लढले आणि आता सत्तास्थापनेच्या वादाला मूठमाती देत दोन्ही पक्ष एकत्रितपणे सरकार स्थापन करतील, अशी शक्यता आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशात शपथविधीच्या वेळी बडेजाव टाळला जाईल.

कार्यकर्त्यांचा मूड गेला!राजभवनवर शपथविधी समारंभ आयोजित करण्यामागे एक कारण असेही आहे की युतीतील दोन्ही पक्ष आणि त्यांच्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये सत्तास्थापनेचे जे नाट्य चालले आहे त्यावरून कटूता आली आहे. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या साक्षीने शपथविधी करण्याचा मूडही राहिला नाही. अनेक मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेनेच्या यंत्रणेने एकमेकांविरुद्ध काम केले. शपथविधी समारंभात मोठी गर्दी झाली आणि त्यातील काही कार्यकर्ते आमनेसामने भिडले तर त्याच्याच बातम्या होतील, हे देखील एक कारण असल्याचे मानले जाते.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीस