Join us  

भाजपा-शिवसेना युती आघाडीच्या पथ्यावर ! काँग्रेस-राष्ट्रवादीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 8:22 AM

काँग्रेस, राष्ट्रवादीचा दावा : मतविभागणीचा धोका टळला

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या शिवसेना-भाजपा युतीमुळे मतविभागणीचा धोका टळला असून ही युती महाआघाडीच्या पथ्यावर पडेल, असा दावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. केंद्र आणि राज्याच्या सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने विरोधकाची भूमिका बजावली. सेनेच्या मुखपत्रातून सरकावर सतत टीका झाली. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर या टिकेला आणखी धार आली. गेल्या साडेचार वर्षात झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकामध्ये हे दोन्ही पक्ष आमने-सामने होते. या निवडणुकीतील प्रचारात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर शेलकी टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर वाघाच्या जबड्यात हात घालण्याची भाषा केली, तर सेनेकडून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना अफजल खानाची उपमा देण्यात आली होती.

समृद्धी महामार्ग, नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्यांवरून शिवसेना नेते उद्धव यांनी भाजपावर सडकून टीका केली होती. शिवसेनेने ताठर भूमिका घेतल्यामुळे भाजपामध्ये अस्वस्थता दिसून येत होती. त्यातून अमित शहा यांनी ‘जे सोबत येणार नाही, त्यांना पटकून देऊ’ असा गर्भीत इशारा सेनेला दिला होता.विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचा शिवसेनेने इतक्यावेळा अपमान केला, ते विसरून भाजपा शिवसेनेच्या दारात युतीसाठी केली. चुकीचे निर्णय घेतले गेले, उद्योग व्यवसाय बुडाले, बेकारी वाढली. हे सगळे मतपेटीतून व्यक्त होणार याची खात्री असल्यामुळे भाजपाला शिवसेनेचे पाय धरणे सोपे वाटले. पण जबड्यात हात घालून दात मोजणारी भाषा जनता अद्याप विसरलेली नाही. अशा अभद्र, अनैतिक, स्वार्थी युतीला मतपेटीमधून जनता धडा शिकवेल, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.किती शेतकºयांची कर्जमाफी केली?काम तर नाहीच, केवळ गप्पा मारणाºया सरकारने किती शेतकºयांची कर्जमाफी केली, असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वडाळा येथे केला.२०१४ च्या निवडणुकीत भाजपाने २४ तर शिवसेने २० जागा लढविल्या होत्या. उर्वरित तीन जागा राजू शेट्टी, महादेव जानकर व रामदास आठवले यांच्या पक्षाला सोडण्यात आल्या होत्या. भाजपाला ुमिळालेल्या मतांची टक्केवारी २७.३२, तर शिवसेनेला २०.६ टक्के मिळाली होती. शिवाय, मोदी लाट होती. या लाटेचा फायदा भाजपासह सेनेच्या उमेदवारांनाही झाला होता. यावेळी तशी परिस्थिती नाही. बेरोजगारी, महागाई आणि शेतकरीविरोधी धोरणांमुळे मोदी सरकारवर जनता नाराज आहे, त्याचा फटका युतीला बसू शकतो, असा दावा काँग्रेस नेत्याने केला.

टॅग्स :शिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस