भाजप-शिंदेसेनेत १५० जागांवर एकमत; भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबईला सोडवण्याचा साटम-सामंत यांचा निर्धार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 08:29 IST2025-12-19T08:29:03+5:302025-12-19T08:29:28+5:30
जागावाटपाची भाजप, शिंदेसेना यांच्यातील दुसरी बैठक गुरुवारी भाजप कार्यालयात झाली.

भाजप-शिंदेसेनेत १५० जागांवर एकमत; भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबईला सोडवण्याचा साटम-सामंत यांचा निर्धार!
मुंबई : महापालिकेच्या २२७ पैकी १५० जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुंबईला भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख प्रशासन देणे हाच महायुतीचा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
जागावाटपाची भाजप, शिंदेसेना यांच्यातील दुसरी बैठक गुरुवारी भाजप कार्यालयात झाली. अनिर्णीत जागांवरील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले.
अमित साटम म्हणाले...
कोणता पक्ष किती जागा लढवतो, यापेक्षा महायुती म्हणून सर्व २२७ जागांवर एकत्र लढणे आणि किमान १५० पेक्षा अधिक जागा जिंकणे हे आमचे ध्येय आहे. गेल्या २५ वर्षांत मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकवणान्यांना आता उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे साटम म्हणाले, पहिल्या बैठकीत ५२ जागांचा किंवा अन्य कोणताही प्रस्ताव दिलेला नाही आणि जागावाटपावर चर्चाही झालेली नाही. तसेच मुंबईचा महापौर बईकरांचा असेल, असेही साटम यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले...
उदय सामंत यांनीही साटम यांच्या भूमिकेला दुजोरा दिला. ते म्हणाले, "महायुती म्हणून आम्ही एकजुटीने पुढे जात आहोत. तिकीट वाटपाच्या वेळीच कोणाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल. उमेदवार निवडीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. महायुतीत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) सहभागी असून सर्व जागा एकत्र लढवण्यावर भर दिला जाणार आहे."