लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई आाणि अन्य काही महापालिकांच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदेसेनेमध्ये नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीनिमित्त दिल्लीत असलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनी शिंदेसेनेबाबत काही मुद्यांवरून पक्षनेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने शिंदेसेनेसोबत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये युती करण्याचे आदेश दिले होते; पण ते डावलून अनेक ठिकाणी आमच्यासोबत युती तोडली, अशी शिंदेसेनेच्या नेत्यांची भावना आहे. ‘आपल्याला युती करायचीच आहे’, असे आम्हाला सांगत राहिले; पण त्यांनी युती तोडली, त्याचा आम्हाला फटका बसला, अशी भावना शिंदेसेनेच्य खासदाराने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
आम्ही निश्चिंत होतो, पण ऐनवेळी झाली धावाधाव
युती होणारच आहे, दिल्लीहूनदेखील तसाच निरोप आहे म्हटल्यानंतर आम्ही निश्चिंत होतो. भाजपच्या वाट्याला हमखास जाणार असलेल्या जागांवर आम्ही कोणतीही तयारी केली नाही, उमेदवार निश्चित केले नाहीत; पण ऐनवेळी भाजपकडून युती तोडली गेल्याने आमची धावाधाव झाली आणि तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही.
ठाण्यासारख्या शहरात जिथे आमचा खूप मोठा प्रभाव आहे तिथेही आम्ही भाजपला सन्मानाने जागा दिल्या; पण छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी त्यांच्या सोईनुसार युती ऐनवेळी तोडली, असा आरोप या खासदारांनी केला. आम्ही दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना भेटू तेव्हा निश्चितपणे त्यांच्या कानावर या गोष्टी घालू, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस येथे आहेत. ते परतल्यावर पुढील आठवड्यात घडामोडींना वेग येईल.
शिंदेसेनेला वाजवीपेक्षा जादा जागा दिल्या...
- भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी पक्षनेतृत्वाला अशी माहिती दिल्याचे समजते, की मुंबईत शिंदेसेनेने वाजवीपेक्षा आणि त्यांच्या ताकदीपेक्षा किती तरी जास्त जागा घेतल्या.
- त्यांनी युतीत घेतलेल्या ९० जागांपैकी किमान २० जागा अशा आहेत की ज्या भाजपला मिळाल्या असत्या, तर नक्कीच जिंकल्या असत्या; पण शिंदेसेनेच्या हट्टाचा फटका बसला. मुंबईतील मराठी पट्ट्यात मतदारांनी शिंदेसेनेपेक्षा उद्धवसेनेला पसंती दिली.
- शिंदे हे ठाकरेंची हक्काची मते खेचून आणतील, असे वाटले होते; पण तसे झाले नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे लवकरच दिल्लीला जातील. पक्षाचे नवे अध्यक्ष नितीन नबीन यांना तसेच अन्य नेत्यांना भेटून यादृष्टीने चर्चा करणार आहेत.
Web Summary : BJP leaders expressed discontent in Delhi regarding seat allocation to Shinde Sena in Mumbai municipal elections. BJP feels they conceded too many seats, impacting their performance. Shinde Sena alleges BJP broke alliances at the last minute in other cities.
Web Summary : मुंबई नगर निगम चुनावों में शिंदे सेना को सीट आवंटन को लेकर भाजपा नेताओं ने दिल्ली में असंतोष व्यक्त किया। भाजपा को लगता है कि उन्होंने बहुत अधिक सीटें छोड़ दीं, जिससे उनके प्रदर्शन पर असर पड़ा। शिंदे सेना का आरोप है कि भाजपा ने अन्य शहरों में अंतिम समय में गठबंधन तोड़ा।