Join us  

भाजपाकडून टाळीसाठी हात पुढे; अमित शहा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 7:27 AM

केंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेनेला फारसे महत्त्व दिेले नव्हते.

मुंबई: शिवसेना नेतृत्त्वाकडून भाजपाविरुद्ध सातत्याने घेण्यात येत असलेल्या आक्रमक भूमिकेपुढे भाजपाने अखेर नमते घेतले आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून शिवसेनेला काडीची किंमत न देणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी स्वत: मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शहा उद्या भाजपाच्या संपर्क दौऱ्यासाठी मुंबईत येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सातच्या आसपास उद्धव ठाकरे आणि अमित शहा एकमेकांना भेटतील. या भेटीच्या माध्यमातून भाजपाने एकप्रकारे युतीच्या टाळीसाठी हात पुढे केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे अमित शहा यांना टाळी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.केंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेनेला फारसे महत्त्व दिेले नव्हते. यापूर्वीच्या शिरस्त्यानुसार भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व मुंबईत आल्यास त्यांची मातोश्री भेट हमखास ठरलेली असायची. मात्र, मोदी आणि शहा यांनी ही प्रथा मोडीत काढून शिवसेना नेतृत्त्वाला फारशी किंमत देत नसल्याचा संदेश दिला होता. मात्र, आता बदलत्या परिस्थितीत भाजपाला शिवसेनेशी जुळवून घेणे भाग पडणार आहे.देशभरात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला होता. भाजपाच्या मतांची टक्केवारी लक्षणीयरित्या घटली होती. याशिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपाविरुद्ध मोट बांधायला सुरूवात केली आहे. नुकत्याच झालेल्या कैराना लोकसभा मतदारसंघात त्याचा प्रत्यय आला. 2019 मध्ये विरोधक अशाप्रकारेच एकत्र आल्यास भाजपासाठी निवडणूक अवघड होईल. अशा परिस्थितीत भाजपाला शिवसेनेसारख्या जुन्या मित्रपक्षाची गरज लागणार आहे. मात्र, भाजपा नेतृत्त्वाकडून सातत्याने मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे गेल्या काही काळात शिवसेनेने भाजपावर कुरघोडी करण्यातच धन्यता मानली आहे. नुकत्याच झालेल्या पालघर पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांमधील संघर्ष शिगेला पोहोचला होता. यानंतर उद्धव ठाकरेंनी भविष्यात भाजपाशी युती करणार नाही, असा निर्धार केला होता. शिवसेनेने हा निर्णय अंमलात आणल्यास भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाने नमती भूमिका घेत आता शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

टॅग्स :अमित शाहउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा