उत्तर मुंबईत भाजपकडून ‘जीएसटी बचत महोत्सव’
By मनोहर कुंभेजकर | Updated: September 25, 2025 19:15 IST2025-09-25T19:14:36+5:302025-09-25T19:15:04+5:30
दरकपात, वाढलेली विक्री आणि आत्मनिर्भर भारताचा देणार संदेश

उत्तर मुंबईत भाजपकडून ‘जीएसटी बचत महोत्सव’
मनोहर कुंभेजकर, मुंबई :उत्तर मुंबई जिल्ह्यात भाजपकडून ‘जीएसटी बचत महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. जीएसटी रिफॉर्ममुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये झालेल्या दरकपातीमुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वॉर्ड, मंडळ आणि जिल्हा स्तरावर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती भाजप नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज दुपारी कांदिवलीतील भाजप लोककल्याण कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
२२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटी रिफॉर्मनुसार, सुमारे ८०% वस्तूंच्या दर १८% वरून थेट ५% टॅक्स ब्रॅकेटमध्ये आणण्यात आल्या आहेत. यामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक बचत तर झालीच, पण बाजारपेठांमध्येही उत्साह दिसून येत आहे.देशाच्या जीडीपी ग्रोथसाठी हे पाऊल निर्णायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, त्यांनी स्पष्ट केले की, ज्या व्यापाऱ्यांकडून कमी दराचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीत, अशा प्रकरणांमध्ये जीएसटी कौन्सिलकडे तक्रार करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
आत्मनिर्भर भारतावर भर
भातखळकर यांनी 'नेक्स्ट जनरेशन जीएसटी'बाबत बोलताना आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराचे महत्व अधोरेखित केले. "जागतिक आर्थिक स्पर्धेत टिकण्यासाठी स्वदेशी उत्पादन वाढवून, देशांतर्गत बाजार बळकट करणे हाच एकमेव मार्ग असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक (बाळा) तावडे, प्रदेश प्रवक्ते गणेश खणकर, सरचिटणीस दिलीप पंडित, प्रसिद्धी प्रमुख नीला राठोड, तसेच आत्मनिर्भर भारत समितीच्या रश्मी बेलवलकर आणि शरद साटम उपस्थित होते.