Join us  

भूषण सुभाष देसाईंच्या शिवसेना प्रवेशाला भाजपाचा विरोध; स्थानिक राजकारण पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 10:03 AM

भूषण सुभाष देसाई यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काहीच काम नाही. उद्योगमंत्री वडील असताना बंगल्यावर पेट्या आणि खोके घेण्याचं काम चालायचं हे बऱ्याच जणांना माहिती आहे असा आरोप भाजपाने केला.

मुंबई - ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाने वडील सुभाष देसाई यांनाच धक्का बसला. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे-शिंदे यांच्यात संघर्षाची लढाई सुरू आहे. शिवसेना नाव, चिन्ह हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाची अडचण वाढली आहे. 

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार, १३ खासदार यांनी उद्धव ठाकरेंविरोधात पवित्रा घेतला. पक्षातील अनेक पदाधिकारी शिंदेंच्यासोबत गेले. त्यात सुभाष देसाई यांच्या चिरंजीवाने शिवसेनेत प्रवेश केला. मात्र आता याच पक्षप्रवेशाला स्थानिक भाजपा नेत्यांकडून विरोध होत आहे. भाजपा गोरेगाव विधानसभेचे उपाध्यक्ष संदीप जाधव म्हणाले की, मातोश्रीचे मुनीम सुभाष देसाईंच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. ज्यांचे सामाजिक क्षेत्रात कवडीचेही योगदान नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत हा प्रवेश अतिशय वेदनादायी आहे. सामाजिक क्षेत्रात एक इंचाचेही काम नाही. भ्रष्टाचाराने हात बरबटलेले व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे गोरेगावकरांच्या भावना तीव्र आहेत. या पक्षप्रवेशाला आमचा विरोध आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी सविस्तर सांगितले आहे. बेंबीच्या देठापासून ओरडणारे भास्कर जाधव यांनाही भूषण सुभाष देसाई कोण हे माहिती आहे. उद्योग खात्यातील अनेक उद्योग त्यांना माहिती आहेत. अशा भ्रष्ट व्यक्तीला पक्षात घेतले त्याचा धोका मित्रपक्षालाही होऊ शकतो असा आरोप भाजपा गोरेगाव विधानसभेचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी केला. 

दरम्यान, भूषण सुभाष देसाई यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काहीच काम नाही. उद्योगमंत्री वडील असताना बंगल्यावर पेट्या आणि खोके घेण्याचं काम चालायचं हे बऱ्याच जणांना माहिती आहे. कसे हिशोब चालायचे. दुबईत मिटिंग कशा चालायच्या. या माणसाकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवणं चुकीचे आहे. आम्ही यांना वर्षानुवर्षे ओळखतोय असंही भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी म्हटलं. 

सुभाष देसाईंनी दिले स्पष्टीकरण'माझा मुलगा भूषण देसाई याने शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.' 'शिवसेना, बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढे सुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे,' अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली. 

टॅग्स :एकनाथ शिंदेसुभाष देसाईभाजपाशिवसेना