Join us  

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या मंजुरीला भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 7:47 PM

पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा बसविण्या कामी शिल्पकार नेमण्यासाठी २ कोटी ९५ लाख रुपयांची निविदा काढली होती.

मीरा भाईंदर महानगरपालिकेने महामार्गा लगतच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ ३० फूट उंचीचा पुतळा उभारण्याच्या निविदा मंजुरीच्या प्रस्तावास सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या स्थायी समिती सभेत विरोध केला आहे. भाजपाने बहुमताच्या बळावर सदर प्रस्ताव फेटाळून लावल्याने शिवसेना, काँग्रेस सह विविध स्तरातून भाजपावर टीकेची झोड उठली आहे. 

घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण एकिकडे सुरू असून त्याठिकाणी जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या जंक्शन वर सगणाई देवी मंदिर जवळ रस्त्यांच्या मध्ये मोठी जागा मोकळी आहे. त्यामुळे सदर जंक्शन वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३० फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा ठराव २ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या महासभेत सर्वानुमते करण्यात आला होता. 

पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा बसविण्या कामी शिल्पकार नेमण्यासाठी २ कोटी ९५ लाख रुपयांची निविदा काढली होती. ह्या कामासाठी गारनेट इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने निविदा भरली होती. सदर काम विशेष व वाकबगार शिल्पकारांचे असल्याने आलेली निविदा मंजुरीसाठी प्रशासनाने स्थायी समिती ला सादर केली होती. 

सत्ताधारी भाजपने प्रस्तावास विरोध करत निविदा पुन्हा सादर करण्याचा ठराव भाजपचे नगरसेवक दिनेश जैन यांनी मांडला. बहुमताने तो मंजूर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव भाजपाने फेटाळून लावला. विशेष म्हणजे भाजपाने महाराजांच्या पुतळ्यास विरोध करण्याची भूमिका घेतल्याने भाजपाचेच नगरसेवक सुरेश खंडेलवाल सभा सोडून निघून गेले. 

या बाबत उपमहापौर तथा भाजपाचे स्थायी समिती सदस्य हसमुख गेहलोत, ठराव मांडणारे भाजपाचे सदस्य दिनेश जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निवडणुकीत मते मागायची आणि दुसरीकडे महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्यास विरोध करायचा यातून स्पष्ट होते की, भाजपा  औरंगजेब - अफजलखानाची पिल्लावळ आहे अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केली आहे.  भाजपचे शिवछत्रपतीं बद्दलचे प्रेम बेगडी असून महाराजां पेक्षा यांना टेंडर टक्केवारीतील मलई खण्यात स्वारस्य असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केला आहे. 

भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामास केलेला विरोध संतापजनक असून जनता व मनसे त्यांना त्यांची जागा दाखवेल असे मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :मीरा-भाईंदरमीरा रोडछत्रपती शिवाजी महाराजभाजपाशिवसेना