Join us

अनिल देशमुखांसोबत ‘त्या’ फोटोत कोण कोण होतं?; नवाब मलिकांविरोधात खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 12:37 IST

ललित हॉटेलचे सीसीटीव्ही बाहेर आणावेत. या हॉटेलच्या २ किमी परिसरात मी दिसलो असेल तर माझ्यावर कारवाई करावी असं चॅलेंज मोहित भारतीय यांनी दिले आहे.

मुंबई – राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) आणि भाजपाचे मोहित भारतीय यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आर्यन खानचं अपहरण करुन वसुली करण्यामागे मास्टर माईंड मोहित भारतीय असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्यानंतर आता मोहित भारतीय यांनी मलिकांच्या आरोपावर उत्तर देत नवाब मलिक वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे खोटे आरोप करत असल्याचा पलटवार केला.

मोहित भारतीय(Mohit Bhartiya) म्हणाले की, सुनील पाटीलशी बोलले हे मलिकांनी मान्य केले. सुनील पाटील आणि सॅम डिसुझाचे संबंध काय? हे समोर आणावं. नवाब मलिकांनी खोटे आरोप लावले त्याविरोधात कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. हळूहळू सत्य बाहेर येत असल्याने ते गोंधळलेले आहेत. बनावट चित्र लोकांसमोर निर्माण करायचं काम नवाब मलिक करत आहेत. मात्र आता सत्य उघड होत असल्यानेच हे प्रकरण विचलित करण्याचा मलिकांचा डाव आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच ललित हॉटेलचे सीसीटीव्ही बाहेर आणावेत. या हॉटेलच्या २ किमी परिसरात मी दिसलो असेल तर माझ्यावर कारवाई करावी. परंतु सह्याद्री गेस्ट हाऊसवर दाऊदचा हस्तक काय करत होता त्यावर उत्तर द्यावं. सरकारचं भय दाखवून घाबरण्याचा प्रयत्न कराल परंतु त्याला भीक घालणार नाही. चिंकू पठाण आणि समीर खान यांचा संबंध काय? नवाब मलिकांनी नोटिशीला उत्तर का दिलं नाही? नवाब मलिक घाबरले आहेत. मलिकांचं पाप जनतेसमोर आलं आहे. ११०० कोटींचा आरोप खोटा आहे. पुरावे असतील तर सिद्ध करावं असं आवाहन मोहित भारतीय यांनी केले आहे.

दरम्यान, सुनील पाटील घराला टाळं लावून पळण्याची गरज काय होती? सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचे २० वर्षापासून संबंध आहेत. अनिल देशमुख आणि चिंकू पठाण यांची बैठक कशासाठी झाली? चिंकू पठाणला हत्यार आणि कॅशसोबत अटक केली. चिंकू पठाण अटकेनंतर २० जणांना अटक केली गेली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस गप्प का? एकाही प्रवक्त्याने त्यावर उत्तर दिलं नाही. अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे. प्रकरण दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न नवाब मलिक करत आहेत असा आरोप मोहित भारतीय यांनी केला.  

टॅग्स :अनिल देशमुखनवाब मलिक