Ram Kadam: जनतेसमोर केलेली भीष्म प्रतिज्ञा अखेर पूर्ण; आमदार राम कदमांनी ४ वर्षांनी कापले केस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:05 IST2025-12-19T11:04:37+5:302025-12-19T11:05:38+5:30
Ram Kadam Haircut Video: भाजप आमदार राम कदम यांनी तब्बल चार वर्षांनी आपले केस कापले, जाणून घ्या त्यामागचे कारण...

Ram Kadam: जनतेसमोर केलेली भीष्म प्रतिज्ञा अखेर पूर्ण; आमदार राम कदमांनी ४ वर्षांनी कापले केस
मुंबईतीलघाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एक आगळीवेगळी बातमी समोर आली. भाजप आमदार राम कदम यांनी तब्बल चार वर्षांनी आपले केस कापले. "जोपर्यंत घाटकोपर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत मी केस कापणार नाही", अशी शपथ त्यांनी घेतली होती. दरम्यान, पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर त्यांनी गुरुवारी जनतेसमोर आपले केस कापून शपथ पूर्ण केली.
घाटकोपर पश्चिमेकडील डोंगराळ भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागायची. लोकांची ही दुर्दशा पाहून राम कदम हे हळहळले आणि त्यांनी चार वर्षांपूर्वी जनतेसमोर शपथ घेतली की, जोपर्यंत घाटकोपरच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत मी सलूनमध्ये जाणार नाही आणि केस कापणार नाही." घाटकोपर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राम कदम यांनी जनतेसमोर आपले केस कापले.
#WATCH | Maharashtra | BJP leader Ram Kadam today cut his hair after four years on the completion of his resolution to resolve the water problem in Ghatkopar pic.twitter.com/Hd0YvCX6x7
— ANI (@ANI) December 18, 2025
राम कदम काय म्हणाले?
घाटकोपर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवणे हे केवळ राजकीय आश्वासन नसून एक मोठे आव्हान होते, असे कदम यांनी म्हटले. ते म्हणाले की, "परिसरात २ कोटी लिटरहून अधिक क्षमता असलेल्या अवाढव्य पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या. भांडुप जलशुद्धीकरण केंद्रापासून थेट घाटकोपरपर्यंत नवी वॉटर पाईपलाईन यशस्वीरित्या जोडली गेली असून ज्या उंच आणि दुर्गम भागात टँकर पोहोचणेही कठीण होते, तिथे आता पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे." घाटकोपरमधील नागरिकांनी पाणी प्रश्न सुटल्याबद्दल समाधान व्यक्त केले.