Join us

"आम्ही परळ, लालबागमध्ये मोठे झालेली पोरं, अपशब्द फक्त तुम्हालाच बोलता येतात का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 15:28 IST

आघाडी सरकारची पोलखोल झालीच पाहिजे असं सांगत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

मुंबई - मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या मुंबई भाजपाच्या 'पोलखोल अभियान' रथावर रात्रीच्या काळोखात भ्याड हल्ला करण्यात आला. महाविकास आघाडीकडे द्यायला उत्तर नसल्यानेचं, भाजपाच्या रथ अभियानावर असे भ्याड हल्ले केले जात आहेत. कोविड काळात झालेला भ्रष्टाचार तसेच महापालिकेतील भ्रष्ट कारभार चेंबूरमध्ये नाक्या नाक्यावर दाखवला गेला पाहिजे अशा शब्दात भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण मुंबईकरांनी पाहिलं पाहिजे, आघाडी सरकारची पोलखोल झालीच पाहिजे. पोलखोल करणाऱ्यांना शिवसेना नेते संजय राऊत शिवीगाळ करतात. त्यांना आव्हान आहे. अपशब्द फक्त तुम्हालाच बोलता येतात का? आम्ही पण परळ, लालबागमध्ये मोठी झालेली पोरं आहोत, आम्हाला देखील अपशब्द बोलता येतात असा टोला लाड यांनी संजय राऊतांना(Shivsena Sanjay Raut) दिला आहे.

मुंबई भाजपाच्यावतीने महाविकास आघाडी सरकार व मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्प येथील भाजपा कार्यालयात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते व आमदार प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली. मुंबई भाजपाच्या पुढाकाराने सुरुवात करण्यात आलेल्या पोलखोल अभियानाचा हा रथ, मुंबईतील वाड्यावस्त्यांवर तसेच प्रत्येक गल्लीत जाऊन मुंबई महापालिकेच्या कामकाजात झालेला भ्रष्टाचार, व्हिडीओ स्वरूपात दाखवणार आहे मात्र तत्पूर्वी सोमवारी रात्री अज्ञात इसमाने त्या रथाचे नुकसान केल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विविध गैरव्यवहाराबाबत पोलखोल अभियान रथ यात्रेची सुरुवात होणार होती. परंतु अज्ञात व्यक्तीने रथाच्या समोरच्या बाजूस तोडफोड केल्यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे. हा हल्ला नेमका कोणी केला? याबाबत शंका निर्माण होत आहे. परंतु हा हल्ला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि भाजपच्या संबंधित इतर नेत्यांनी यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रथाचे वाहन फोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीबद्दल रीतसर तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :शिवसेनाभाजपा