Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:18 IST

घाटकोपरमध्ये आमदार पराग शाह यांनी कायदा हातात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

BJP MLA Parag Shah:मुंबईतील घाटकोपर पूर्व परिसरात शुक्रवारी दुपारी एका सत्ताधारी आमदाराने कायदा हातात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार पराग शाह यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एका रिक्षाचालकाला चक्क भररस्त्यात मारहाण आणि शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावरून आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं?

घाटकोपर पूर्वेकडील वल्लभबाग लेन आणि प्रसिद्ध खाऊगली परिसरात पदपथांवरील अतिक्रमणाबाबत स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी होत्या. दुकानदार आणि फेरीवाल्यांनी पदपथावर खुर्च्या-बाकडे मांडून रस्ता अडवल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. या तक्रारींची दखल घेत आमदार पराग शाह या भागाच्या पाहणीसाठी आणि अनधिकृत अतिक्रमणाविरोधात आंदोलन करण्यासाठी गेले होते.

पाहणी सुरू असतानाच, महात्मा गांधी मार्गावर एक रिक्षाचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चुकीच्या दिशेने रिक्षा चालवत येताना दिसला. हे पाहून संतापलेल्या आमदार पराग शाह यांनी रिक्षा थांबवली आणि थेट चालकाच्या कानशिलात लगावली. व्हिडिओमध्ये ते चालकाला शिवीगाळ करतानाही दिसत आहेत.

आमदारांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला?

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी पराग शाह यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. "वाहतूक नियम मोडणाऱ्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे आणि आरटीओचे काम आहे, आमदारांचे नाही," असे विरोधकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे भररस्त्यात मारहाण करणे हे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

सोशल मीडियावर या घटनेबाबत दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. काही नागरिकांनी पराग शाह यांच्या कृतीचे समर्थन केले असून, "वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अशाच धड्याची गरज आहे," असे म्हटले आहे. तर दुसरीकडे, सुज्ञ नागरिकांनी "आमदारांनी मारहाण करण्याऐवजी पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती," असे मत व्यक्त केले आहे.

प्रशासनाची भूमिका

या सर्व प्रकरणावर अद्याप पोलीस किंवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आमदारांविरोधात गुन्हा दाखल होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP MLA slaps rickshaw driver for wrong-way driving in Mumbai.

Web Summary : BJP MLA Parag Shah assaulted a rickshaw driver in Ghatkopar for driving against traffic. The incident sparked outrage and political controversy, with calls for legal action against the MLA. Public reactions are mixed.
टॅग्स :मुंबईभाजपामुंबई पोलीस