Join us  

"अहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल तर..."; उद्धव ठाकरेंना राणेंनी डिवचलं

By मुकेश चव्हाण | Published: December 01, 2020 10:58 AM

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षानं वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठाकरे सरकारनं सहा महिन्यांहून अधिक काळ राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवली होती. त्यावरूनही भाजपनं शिवसेनेला लक्ष्य केलं. याचदरम्यान आता भाजपाने शिवसेनेला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती दिली. याबद्दलचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अजानमध्ये फार गोडवा असतो. ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल, असं मनाला वाटतं राहतं, अशा शब्दांत सकपाळ यांनी अजानचं कौतुक केलं आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजान स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटांत अजान संपवतात, कशी प्रकारे म्हणतात, याकडे मौलाना लक्ष देतील. ते परीक्षक म्हणून काम पाहतील. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना करेल,' असं सकपाळ यांनी सांगितलं. सकपाळ यांच्या या भूमिकेनंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, हो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की, तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता "सेक्युलर"आहे. नाहीतर "हो मी नामर्द आहे'' असं तरी सांगा, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. 

सत्तेसाठी शिवसेनेचा नूर पालटत आहे- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वधर्म समभाव सांगत शिवसेनेचा हा अभिनव उपक्रम असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं होतं. सपकाळ यांनी दिलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या दाखल्यावर दरेकर यांनी आक्षेप घेत सडकून टीका केली. पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहे. शिवसेनेचं बदलतं स्वरुप सत्तेनंतर दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे. बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचला असं ते कधी बोलले नाहीत.  त्यांनी नेहमी त्यांच्या आचार विचारावर टीका केली, असं दरेकर म्हणाले.

भाजपाच्या टीकेनंतर पाडुरंग सकपाळ यांनी केला खुलासा

अजानच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांनी खुलासा केला आहे. पांडुरंग सकपाळ म्हणाले, मुंबादेवी विधानसभेतील फाउंडेशन फॉर युथ' नावाच्या संस्थेच्या सदस्यांनी अजानची खुली स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून दिले. खुली स्पर्धा केल्यास नियमांची पायमल्ली होईल हे निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात असं सूचवलं. अशा शुभेच्छा देताना माझ्या मनात धार्मिक किंवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे या गोष्टीचे राजकारण करण्यात येऊ नये," असंही सकपाळ म्हणाले.

मंत्री आदित्य ठाकरेंनी 'अजान'साठी थांबवलं होतं भाषण

औरंगाबादमध्ये 2018 साली एका कार्यक्रमात मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनीही 'अजान' सुरू असताना भाषण थांबवण्याची सूचना केली होती. हिंदुत्व आमची राष्ट्रीयता आहे. माझे आजोबा बाळासाहेब ठाकरेंकडून आम्हाला अजान सुरू असताना भाषण न करण्याची शिकवण मिळाली आहे म्हणून मी महापौरांचं भाषण थांबवलं," असं आदित्य ठाकरेंनी त्यावेळी म्हंटलं होतं.

टॅग्स :उद्धव ठाकरेनीतेश राणे शिवसेनाभाजपामहाराष्ट्र विकास आघाडी