Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करणे, हे तर शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम; भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 19:33 IST

भाजपा आमदार व माजी राज्यमंत्री योगेश सागर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मुंबई- मुंबईत शहरात राहणाऱ्या गरीब परिवारातील ,झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि अनुदानित शाळेतील मध्यमवर्गीय  परिवारातील विद्यार्थ्यांच्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या उद्या दि, 12 रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परिक्षा रद्द केल्याचे परिपत्रक पालिकेने जारी केले आहे. मुंबई वगळता महाराष्ट्रात मात्र उद्या या परिक्षा होणार आहे. गेली अनेक महिने या परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब झोपडपट्टीत राहणाऱ्या महापालिका व अनुदानित मध्यम  वर्गीय शाळेतील मराठी विद्यार्थ्यांवर हा घोर अन्याय आहे.

 पालिकेत शिवसेनेची सत्ता असतांना शिशुवृत्ती परीक्षा रद्द का रद्द केली असा सवाल करत  शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम आता उघड झाल्याची टीका चारकोप विधानसभेचे भाजपा आमदार व माजी राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली आहे. या संदर्भात  खुलासा करावा असे पत्र त्यांनी महापौरांना  दिले असून सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकीकडे मुंबईचा कोरोना नियंत्रणात आला अशी फुशारकी मारणाऱ्या शिवसेनेने सदर शिष्यवृत्ती परिक्षा रद्द करणे म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्या महापालिका व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांवर हा घोर अन्याय आहे अशी टिका त्यांनी केली.

गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल,लॅपटॉप नाही.मग ते ऑनलाईन शिष्यवृत्ती परिक्षा कशी घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी गाजावाजा केला,मात्र विद्यार्थ्यांची सरकारने फी माफ तर केलीच नाही,आणि आता शिष्यवृत्ती परीक्षा रद्द केली ही तर गरीब कुटुंबियांवर गदा आणली आहे. शिवसेना गरीब,झोपडपट्टीत राहणाऱ्या मराठी कुटुंबियांचे अजून किती खच्चीकरण करणार आहात,त्यांचे आर्थिक खच्चीकरण कधी थांबवणार आहात असा सवाल त्यांनी केला. मुंबई शहरातील विशेष करून मराठी भाषिकांच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम सरसकट सरकारने विद्यार्थ्यांच्या खातात  टाकावी अशी आग्रही मागणी आमदार योगेश सागर यांनी  केली आहे.

टॅग्स :भाजपाशिवसेना