Join us  

भाजपा आमदारानं पत्र पाठवून केले आदित्य ठाकरेंचं अभिनंदन; नेमका काय आहे प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 2:16 PM

पर्यावरण खात्याचं मंत्रिपद मिळवण्यासाठी आपलं कर्तृत्व काय होतं? हा प्रश्न न विचारलेलाच बरा, कारण त्याचे उत्तर तुम्हाला ठाऊक आहे असं साटम यांनी म्हटलं.

मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. भाजपा आमदार अमित साटम यांनी माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र या अभिनंदनातून भाजपा आमदाराने आदित्य ठाकरे शालजोडे हाणले आहेत. विश्वासघाताने युतीधर्म तोडून व हिंदुत्वाशी तडजोड करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पितृकृपेने पर्यावरण खात्याचं मंत्रिपद तुमच्या पदरात पडलं होतं असा साटम यांनी म्हटलं. 

अमित साटम यांनी पत्रात म्हटलंय की, पर्यावरण खात्याचं मंत्रिपद मिळवण्यासाठी आपलं कर्तृत्व काय होतं? हा प्रश्न न विचारलेलाच बरा, कारण त्याचे उत्तर तुम्हाला ठाऊक आहे. मी तुम्हाला अभिनंदन करण्यासाठीच हा पत्रव्यवहार करतोय. कारण तुम्ही पर्यावरण मंत्री असताना केलेल्या कर्तृत्वावर आता न्यायालयानेच महाराष्ट्र सरकारला तब्बल १२ हजार कोटी दंड ठोठावून मोहोर उठवली आहे आहे त्यासाठी तुमचे अभिनंदन असा टोला त्यांनी लगावला आहे. 

तसेच मुंबईकरांच्या जीवाला हानीकारक असलेला घनकचरा आणि सांडपाणी यांची विल्हेवाट न लावता आल्याने हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या पीठाने मागील आठवड्यातच हे आदेश दिले. मुंबईसाठी क्लायमेट अँक्शन प्लॅनच्या भूलथापा मारण्याशिवाय आणि जनतेच्या पैश्यावर परदेश दौरा करण्याशिवाय आपण काहीही साध्य केले नाही. ना घन कचऱ्यावर प्रक्रिया करता आली ना सांडपाण्यावर. मलमिश्रीत काळेपाणी समुद्रात सोडून मुंबईच्या समुद्राला मात्र तुम्ही काळा समुद्र करून दाखवले असं अमित साटम यांनी आरोप केला. 

दरम्यान, आपले कर्तृत्व एवढेच की ब्लॅक सी पाहण्यासाठी मुंबईकरांना युरोपात जाण्याची गरज नाही. तो आपण मुंबईकरांना इथेच दाखवला आहे आणि हे आम्ही म्हणत नसून हरित लवादाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब केले आहे. आपण दाखवलेल्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटी दंड ठोठावला गेला व मुंबईकरांना काळा समुद्र मिळाला यासाठी आपले परत एकदा अभिनंदन असा चिमटा भाजपा आमदार अमित साटम यांनी आदित्य ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात काढला आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेभाजपाअमित साटम