Join us

“गणपतीपूर्वी मुंबईच्या रस्त्यावरील सर्व खड्डे पूर्णपणे भरा”; आशिष शेलारांचे स्पष्ट निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 09:52 IST

Ashish Shelar News: या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून याबाबत मुंबईच्या यंत्रणांची आढावा बैठक आशिष शेलार यांनी घेतली.

Ashish Shelar News: सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे येत्या तीन दिवसांत, गणपतीपूर्वी पूर्णपणे भरा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून याबाबत मुंबईच्या यंत्रणांची आढावा बैठक आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, ट्रॅफिक पोलिस अधिकारी,  एमएसआरडीसी अधिकारी, एमएमआरडीए, एसआरए, अधिकारी, रेल्वे चे अधिकाऱ्यांसह माजी नगरसेवक उपस्थित होते.

याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की,  मुंबईत पावसामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. रस्त्यांवर, हायवेवर, आतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून, आज या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यांसह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. महापालिकेकडे आतापर्यंत तब्बल ८ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी खड्डे असून या बैठकीत येत्या तीन दिवसांत, गणपतीपूर्वी सर्व खड्डे पूर्णपणे भरण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

महापालिकेकडून खड्डे भरण्यासाठी वापरले जाणारे ‘मास्टीक तंत्रज्ञान’ वाहतुकीच्या दृष्टीने प्रभावी ठरत असल्याने, झोननिहाय नियुक्त कंत्राटदारांकडून हेच तंत्रज्ञान वापरून काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच, वाकोला, विक्रोळी, गोरेगाव आदी ठिकाणच्या उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत असल्याचे लक्षात घेऊन, एमएसआरडीसीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा महापालिका स्वतः खड्डे भरण्याचे काम हाती घेईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गणपतीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने सर्व कामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा निर्देश या बैठकीत दिले.

 

टॅग्स :आशीष शेलारगणपती 2025गणपती उत्सव २०२५गणेश चतुर्थीमुंबई