मुंबई: लग्नासाठी मुली पळवून आणू, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुलींचा अपमान करणाऱ्या राम कदम यांच्या विधानाची भाजपानं दखल घेतली आहे. भाजपाच्या प्रदेश कार्यालयानं राम कदम यांच्या विधानाची सीडी मागवली आहे. त्यामुळे आता राम कदम यांच्यावर भाजपाकडून केली जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला मुलगी पसंत असल्यास तिला पळवून आणू, असं बेताल वक्तव्य राम कदम यांनी दहिहंडी उत्सवात केलं होतं. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून टीका झाली. विरोधकांसह सर्वसामान्यांनीदेखील राम कदम यांच्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला. यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. राम कदम यांच्या विधानाची सीडी प्रदेश कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज मुंबईत येणार आहेत. त्यामुळे राम कदम यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी अनेक पक्ष आणि संघटना आज त्यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी आंदोलनं करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राम कदम यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
वादग्रस्त विधान राम कदमांना भोवणार? प्रदेश कार्यालयानं मागवली वक्तव्याची सीडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 12:42 IST