Join us
Daily Top 2Weekly Top 5

"नायक चित्रपटाप्रमाणे शिंदे अन् फडणवीस सरकार वेगाने निर्णय घेत आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:21 IST

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

मुंबई- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर विविध निर्णय घेताना दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघं अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झाले आहेत, हे दोघंच सगळे निर्णय घेताय, अशी टीका केली होती. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं आहे. 

शिंदे सरकारच्या या वेगवान निर्णयांची तुलना थेट नायक चित्रपटाशी केली. हे निर्णय पाहिल्यानंतर या महाराष्ट्रातून एकच आवाज येत होता की, नायक चित्रपटामधील नायक जसा निर्णय घेतो तसे वेगाने निर्णय होत आहेत, असं सुधीर मुनगंटीवर म्हणाले. आता या निर्णयांनंतर सुद्धा टीका होता आहे. काही लोकांचं समाधान आयुष्यभर होऊ शकत नाही, असा टोलाही सुधीर मुनगंटीवर यांनी लगावला आहे. 

तत्पूर्वी, राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 

जी आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेतली. तिच भूमिका दिल्लीत हे खासदार घेत आहेत. याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. जनतेच्या मनातलं सरकार आम्ही राज्यात स्थापन केलं आहे आणि याचं स्वागत या १२ खासदारांनीही केलं आहे. उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील केस कोर्टात आहे. त्या कामासाठी मी इथं आलो होतो. त्यासोबतच या खासदारांचं स्वागतही करण्यासाठी इथं आलो आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीससुधीर मुनगंटीवार