Join us  

संजय राऊत, नाना पटोले वैफल्यग्रस्त; भाजपा नेते प्रविण दरेकरांचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 5:37 PM

कायद्याच्या चौकाटीत टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे तकलादू आरक्षण द्यायचे नाही असं पहिल्या दिवसापासून सांगितले आहे.

मुंबई - संजय राऊत, नाना पटोले हे वैफल्यग्रस्त झाले आहेत.सकाळी उठल्यावर काहीतरी निराधार शोधायचे आणि पब्लिसिटीत राहायचे अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊला सहकुटुंब होते त्याच हॉटेलमध्ये खाली रेस्टॉरंट आहे. ते कुटुंबासोबत असताना राजकारण करत ट्विट करणे हे अशोभनीय आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपलीही बोटं बर्बटलेली आहेत अशी घणाघाती टीका भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे तसेच संजय राऊत मुद्दामहून आदित्य ठाकरे यांना डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये, ट्विट करतात का? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. 

पत्रकार परिषदेत दरेकर म्हणाले की, उबाठा पक्षाच्या नेत्यांनी टीका करताना, भूमिका मांडताना एकवाक्यता ठेवली पाहिजे. अंधारे यांची भूमिका वेगळी आणि भास्कर जाधवांची भूमिका वेगळी त्यामुळे त्यांनी भूमिका ठरवावी. कुणाला चालवण्याची भाजपाला अजिबात आवश्यकता नाही. भाजपा स्पष्ट भूमिका घेऊन राजकारण करते. आमच्या सरकारची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केलीय. उबाठा पक्षाला भूमिका नाही त्यामुळे असेच काहीतरी शोधून आपले राजकारण करता प्रयत्न सुरू असल्याचेही दरेकर म्हणाले.

...तेव्हा उद्धव ठाकरेंचे हायपाय बांधले होते का?

मराठा आरक्षण हा विषय आपापल्या सोयीने एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी रीतसर मार्गाने दिले होते. त्यात ज्या त्रुटी दाखवल्या आहेत. ज्या अडचणी आहेत त्यावर मार्ग काढून मराठा आरक्षण द्यायला हवे. केंद्राने काय करायचे अडीच वर्ष उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांचे हातपाय बांधले होते का? असा सवालही प्रविण दरेकर यांनी केला तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यायची ही महाराष्ट्र सरकारची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या चौकाटीत टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे तकलादू आरक्षण द्यायचे नाही असं पहिल्या दिवसापासून सांगितले आहे. ज्या प्रक्रिया आहेत त्यासाठी वेळ लागतोय.जरांगे पाटील यांनी परिस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचं प्रविण दरेकर म्हणाले. त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करत असताना आपली प्रतिमा आणि प्रतिभा जपलेली आहे. जालनातील लाठीचार्जमध्ये गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाशी संबंध नाही. प्रशासकीय पातळीवर गृहविभाग निर्णय घेत असतो.अधिकाऱ्यांना ते अधिकार असतात असंही दरेकरांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :प्रवीण दरेकरसंजय राऊतनाना पटोले