Join us  

मंगल प्रभात लोढा-राज ठाकरेंचे ‘गुफ्तगू’; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 6:19 AM

त्यांच्यातील गुफ्तगू राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होती.

मुंबई : मुंबई  महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने ‘एकला चलो’ची भूमिका जाहीर केली आहे. मात्र पडद्याआडून बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या भुवया उंचावल्या. लोंढा यांनी ही वैयक्तिक भेट असून कोणतीही  राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र त्यांच्यातील गुफ्तगू राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होती.

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी ‘लाव तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाविरुद्ध प्रचाराची राळ उठवली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून त्यांचा सूर बदलला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरे यांची अनेक वेळा भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे एकत्रित लढण्याची शक्यता वर्तवली जात असताना दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले.

मात्र लोंढा यांनी रविवारी सकाळी राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. लोढा यांनी वैयक्तिक भेट असल्याचे सांगत त्यावर जास्त भाष्य केले नाही. तर मनसेकडून ही काही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. 

टॅग्स :मंगलप्रभात लोढाराज ठाकरेभाजपामनसे