Join us

सरनाईकांच्या अडचणी वाढणार?; चौकशीदरम्यान सोमय्या 112 'सातबारा'सह थेट ईडी कार्यालयात

By मुकेश चव्हाण | Updated: December 23, 2020 18:32 IST

ईडीची चौकशी सुरू असतानाच भाजपाचे नेते किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले.

मुंबई: शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची गेल्या 5 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर पूर्वेश सरनाईक आज नोटीस देऊनही ईडीसमोर हजर झालेले नाहीत. पूर्वेश यांना आतापर्यंत दोन समन्स बजावण्यात आलेले आहेत. तर विहंग यांची दुसऱ्यांदा ईडीची चौकशी सुरू असतानाच भाजपाचे नेते किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले. यानंतर किरीट सोमय्या यांनी विहंग हौसिंग सोसायटीच्या घोटाळ्याची ईडीला माहिती दिली. प्रताप सरनाईक यांनी या सोसायटीतील काही संपत्ती हडप केल्याचा आरोप करत प्रताप सरनाईक यांच्याकडे 112 सातबारे असल्याची तक्रारही किरीट सोमय्या यांनी ईडीकडे केली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रताप सरनाईक यांनी 250 कोटी रुपये ढापल्याचे आरोपही किरीट सोमय्या यांनी केले आहे. तसेच त्यांनी कंपनीचे नावही बदलले आहे. प्रताप सरनाईक यांनी ज्या लोकांची संपत्ती जप्त केल्या, त्यांची नावे सातबाऱ्यावर नसल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे ईडी यासर्वप्रकरणावर काय भूमिका घेणार,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले आहेत. OC न घेताच सर्व फ्लॅटची विक्री केली असा आरोप सोमय्या यांनी केला. 2008 साली ठामपा ने सदर बांधकामाला अनधिकृत ठरवले व तोडक कारवाईचे आदेश दिले परंतु आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त जात असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली यापूर्वी केली होती. 

प्रताप सरनाईकांनी आरोप फेटाळले-

किरीट सोमय्या सारख्या नेत्यांनी देखील अशीच कृत्ये मागील काही दिवसापासून केले आहे, मी प्रत्येक शंकेचे निरसरण ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर केलेले आहे. अजूनही काही शंका असतील तरी १०० वेळा येण्यास मी तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच चौकशीला सहकार्य करेल असेही स्पष्ट केले आहे. परंतु १० वर्षापूर्वीचे प्रकरण पुढे आणून माझी बदनामी करण्याचे काम ठाण्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आणि किरीट सोमय्या यांनी सुरू केले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी जी काही बदनामी केलेली आहे. त्याच्या विरोधात मी १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :प्रताप सरनाईककिरीट सोमय्याशिवसेनाभाजपाठाणेअंमलबजावणी संचालनालय