Join us  

'इथं तुमचे हजारो बाप अन् आया बसल्या आहेत'; गोपीचंद पडळकरांचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 3:12 PM

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुंबई: महाराष्ट्रात एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही. तोपर्यंत माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. त्यातच विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शवत आझाद मैदानात आंदोलन सुरु ठेवले आहे. आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नेतृत्वहीन झालंय, आम्ही बोलायचं कुणाशी. अरे इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसल्या आहेत, त्यांच्याशी येऊन बोला ना, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच आम्ही तुम्हाला फक्त विलिनीकरण करा असं म्हणत नाही. तर पर्यायही देत आहोत. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पर्याय दिला आणि जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं तेच एसटी कर्मचाऱ्यांना कसं मिळू शकतं हे सांगितलं, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

राज्य सरकारच्या तिजोरीतून या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या ७ तारखेला झाले पाहिजे. एक दिवस सुद्धा पुढे गेला नाही पाहिजे. तुम्ही राज्य सरकारमध्ये आम्हाला घेऊ शकता. हे कष्टकरी पैसे आणून देतात. तेच पैसे भ्रष्टाचारात जातात. तो भ्रष्टाचार थांबवला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर महामंडळांपेक्षा दुप्पट होऊ शकतो, असं गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले.  एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर जाऊन परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार असल्याचं पडळकरांनी सांगितलं.

सरकारचीच सेवा समाप्त करा-

आपल्या न्याय मागण्यांसाठी हक्काचा लढा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर सरकार अन्याय करीत आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात आहे. काहींचे निलंबन तर काहींची सेवा समाप्त केली जात आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांनो जागे व्हा. तुमची सेवा समाप्त करणाऱ्या सरकारचीच सेवा समाप्त करा असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. 

एसटी कर्मचाऱ्यांचा संप नेतृत्वहीन- मंत्री अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांचा संप नेतृत्वहीन झाला असून त्यावर सध्या कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसते. त्यामुळे चर्चा करायची कुणाशी, असा प्रश्न निर्माण झाल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वतीने आश्वासने, सूचना देणाऱ्यांचेही कोणी ऐकत नाही, असे दिसून येत आहे. संपाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या नेत्यांशीही आम्ही चर्चा केली. त्यांच्या सूचना ऐकल्या. पण आंदोलक त्यांचेही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांच्या नेत्यांनी परत संपर्कही साधलेला नाही, असे सांगत त्यांचे या आंदोलनावरील नियंत्रण सुटल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :एसटी संपउद्धव ठाकरेगोपीचंद पडळकरमहाराष्ट्र विकास आघाडी