Join us
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक टोमणे बॉम्ब! फडणवीसांचा ठाकरेंना टोला; लवकरच 'ठोक के जवाब' देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 22:36 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई: आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आता फडणवीस आम्हाला गधाधारी म्हणतात. पण आम्ही गदाधारी आहोत. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. आम्ही आधी गधाधारी होतो. पण गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सणसणीत टोला लगावला. मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम.. अरे छट हा तर निघाला.. आणखी एक टोमणे बॉम्ब,' अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असं फडणवीसांनी ट्विटच्या शेवची म्हटलं आहे. त्यामुळे फडणवीसांच्या पुढील भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची एक सभा झाली. त्यावेळी त्यांच्या तोंडातून एक वाक्य निघालं. मुंबई स्वतंत्र करू म्हणाले. मुंबई स्वतंत्र करू म्हणायला ती काय पारतंत्र्यात आहे का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. मूळात भाजप आणि स्वातंत्र्यांचा संबंध काय? स्वातंत्र्यावेळी भाजप नव्हता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात होता. पण त्यांचा स्वातंत्र्य लढाईत सहभागी नव्हता, असं ठाकरे म्हणाले.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानं त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. यावर देखील उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. हो, आम्ही काँग्रेससोबत गेलो, मात्र ते उघड गेलो. आम्ही केलं ते उघड केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर पाप आणि तुमची सकाळची शपथ काय होती? जर ती यशस्वी झाली असती तर आज नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे