Join us  

'त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे, हे आता संजय राऊत यांनीही मान्य केलं'; चंद्रकांत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 4:08 PM

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाघ शब्दावरुन चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई: राज्यातील शिवसेना आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये जेव्हा युती होती, तेव्हा सख्य आणि विरोधात असताना वैर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. शिवसेनेसोबत असलेली युती तुटल्यापासून या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्षांमधील कलगीतुरा कोरोना काळातही सुरूच आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाघ शब्दावरुन चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर दोस्तीवरुन शाब्दीक कुस्ती करताना दिसत आहेत. आता, वाघ पिंजऱ्यात असो की जंगलात, तो वाघच असतो. हिंमत असेल तर वाघाशी मैत्री करायला पिंजऱ्यात या, महाराष्ट्रात वाघाचे राज्य आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता. 

संजय राऊतांच्या या विधानावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. किमान संजय राऊत यांनीही हे मान्य केलं की, त्यांचा वाघ हा पिंजऱ्यामध्ये आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी बोलत होते. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं होतं. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीदेखील वाघाशी कुणाची मैत्री होत नाही, मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. 

वाघाच्या भांडणात छगन भुजबळांचीही उडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. "राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे आहे. त्यामुळे जमवून घ्यावे लागते. मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असते, वाघ पंजाही मारू शकतो," असं सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चेच्या संदर्भात बोलताना भुजबळ यांनी केलं.

टॅग्स :संजय राऊतचंद्रकांत पाटीलशिवसेनाभाजपा