Join us  

भाजपाकडे उमेदवार नाही, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर; पाटलांनी यादीच काढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 11:29 PM

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन विविध उदाहरणचं दिली आहे.

Shivsena Dasara Melava 2021: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यातून भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला आहे. सध्या केंद्र सरकारकडून छापा काट्याचा खेळ सुरू आहे. छापा टाकायचा आणि काटा काढायचा अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि आयकर विभागाच्या कारवायांवर मोजक्या शब्दांत भाष्य केलं. सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याची भाषा केली जात आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलं. 

भाजपा देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत. यांना  इथले तिथले उपरे उमेदवार शोधावे लागतात. भाजपा म्हणजे नुसती प्लॅटफॉर्मवरची गर्दी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन विविध उदाहरणचं दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंढरपूर आणि आता देगलूरला बाहेरून उमेदवार आणला अशी टीका करता, तर तुमची उमेदवारांची यादी वाचा अब्दुल सत्तार कोठून आले, भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा उमेदवार म्हणून पळविला. तो पराभूत झाला. तेथे आम्ही ज्याला निवडून आणले त्याला तुम्ही जागावाटपात जागा घेतल्यानंतर आमचा सिटिंग खासदार घेतला. तुम्ही शिवसेनेच्या ३०-३५ जागांवर भाजपाचे उमेदवार घेतले. गौरव नायकवाडी, कोरेगावचे महेश शिंदे, अशी मोठी यादी आहे. जागा सेनेची पण उमेदवार भाजपाचा असे घडले. तेव्हा आम्ही चुकीचे म्हटले नाही, असा निशाणा चंद्रकांत पाटील यांनी साधला.

तत्पूर्वी, "मला काही मुख्यमंत्री व्हायची हौस नव्हतीच. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही आणि मला वडिलांना दिलेलं वचन पाळायचं होतं, म्हणून माझ्यावर प्रशासनात यायची वेळ आली. पुत्र कर्तव्य म्हणून मी राजकारणात आलो. तुम्ही जर त्यावेळी शब्द पाळला असता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला असता तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. तुमचाही मुख्यमंत्री नक्कीच पाहायला मिळाला असता. पण नशीब नावाचीही एक गोष्ट असते जी तुमच्या बाजूनं नव्हती", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

अजून बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण झालेला नाही- उद्धव ठाकरे

तुम्ही (देवेंद्र फडणवीस) दिलेला शब्द पाळला असता तर आजही तुम्हीच मुख्यमंत्री असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही शब्द पाळला नाही. पण मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पाळलं. त्यामुळेच मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मी बाळासाहेबांना दिलेलं वचन अजूनही पूर्ण झालेलं नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन असा शब्द मी बाळासाहेबांना दिलेला होता. तो अद्याप पूर्ण करायचा आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवायचं आहे. बाळासाहेबांना दिलेला शब्द मी नक्कीच पूर्ण करेन, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलभाजपाशिवसेना