Join us  

"नवाब मलिक दाऊदचा माणूस; तरीही ते मंत्रिमंडळात, याला दोनचं कारणं", भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 1:17 PM

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आताच्या घडीला आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. यातच आता नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मुंबई विशेष न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. ईडीने मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल न्यायालयाने घेतली. 

न्यायालयाच्या या स्पष्टीकरणानंतर भाजपाने निशाणा साधला आहे. नवाब मलिक हे दाऊदचा माणूस आहे. तरीही ते मंत्रिमंडळात आहे. याची दोन महत्वाची कारण म्हणजे पवार आणि ठाकरे..., असं भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

विशेष न्यायालयाने न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची दखल घेताना स्पष्ट केलं की, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला. ज्यातनं या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्यानं शिक्षेसाठी पात्र आहेत. त्यानंतर ती भाडेपट्टी अस्लमच्याच नावावर करण्यात आली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचेही यावेळी न्यायालयाने नमूद केले आहे. 

दरम्यान, २१ एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि त्यांचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्याचेही पुढे आले आहे. दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी आणि सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

ईडीने चार्टशीटमध्ये १७ जणांना साक्षीदार बनवले-

ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये १७ जणांना साक्षीदार बनवले आहे. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांच्यासह सरदार शाहवली खान यांच्या जबाबांचाही समावेश आहे. हसीना पारकर दाऊद इब्राहिमच्या जवळची होती आणि सलीम पटेल पारकरचा अंगरक्षक होता, असे शाहवली खानने आपल्या वक्तव्यात सांगितले. मालमत्तेबाबतचा प्रत्येक निर्णय हा हसीना पारकर यांच्या सूचनेनुसार पटेल यांनी घेतला, असेही सांगितले.

टॅग्स :नवाब मलिकअतुल भातखळकरराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा