पियुष गोयल आता बोरीवलीकर, वाचा सविस्तर
By रेश्मा शिवडेकर | Updated: April 9, 2024 19:18 IST2024-04-09T19:16:45+5:302024-04-09T19:18:34+5:30
उत्तर मुंबईत असलेल्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून अनेकदा बाहेरच्या उमेदवारांना भाजपाने संधी दिली.

पियुष गोयल आता बोरीवलीकर, वाचा सविस्तर
मुंबई: बोरीवलीतील नामांकित आणि प्रिमिअम समजल्या जाणाऱ्या निवासी संकुलात घर घेत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पियुष गोयल यांनी इथल्या स्थानिक विरूद्ध उपरे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर मुंबईतील स्थानिक रहिवाशी आणि भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांना डावलून मलबार हिल येथे राहणाऱ्या गोयल यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून भाजपामध्ये स्थानिक विरूद्ध उपरे मुद्द्यावरून दबक्या आवाजात कुरबुरी सुरू होत्या. विरोधकांकडूनही या मुद्द्याचा वापर होत होता. परंतु, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बोरीवलीतील आपल्या आलिशान घरात प्रवेश करून आणि नव्या घरात सपत्नी गुढी उभारून गोयल यांनी या चर्चेची धार बोधट करण्याचा प्रयत्न केला आहे.
गोयल यांनी बोरीवली पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या टाटा पॉवर हाऊस येथील ऑबेरॉय स्काय या आलिशान निवासी संकुलात घर घेतले आहे. गोयल यांच्या गृहप्रवेशाच्या प्रसंगी विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते.
हा वाद जुनाच
उत्तर मुंबईत असलेल्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून अनेकदा बाहेरच्या उमेदवारांना भाजपाने संधी दिली. पालघरच्या मनिषा चौधरी यांना दहिसरमधून तिकीट देण्यात आले होते. उत्तर मुंबईचे माजी खासदार राम नाईक हे देखील मूळचे गोरेगावचे. त्यामुळे त्यांच्याबाबतही मतदारांची हीच भावना होती. त्यानंतर विलेपार्लेचे विनोद तावडे, वरळीचे सुनील राणे यांनी बोरीवलीतून लढत आमदारकी मिळवली. तावडे यांचे तिकीट कापल्याने २०१९मध्ये भाजपाने राणे यांना बोरीवली या आपल्या खात्रीच्या मतदारसंघातून निवडून आणले. पुढे राणे यांनी बोरीवलीत घर घेत स्थानिक विरूध्द उपरे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आता हाच कित्ता गोयल यांनी गिरवल्याचे दिसून येत आहे.