Join us  

'कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजपा लोकशाहीचा खून करत आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 1:43 PM

'काँग्रेसच्या नेत्यांनाही आमदारांना भेटू दिले जात नाही. हा घोडेबाजार लोकशाहीला धरून नाही.'

मुंबई : कर्नाटकातील सत्ता संघर्षाला नवीन वळण आले आहे. काँग्रेस-जनता दलाचे (एस)बंडखोर आमदार मुंबईतील पवई येथीस रेनेसन्स हॉटेलमध्ये थांबले आहेत. या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेता डीके शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्या रेनेसन्स हॉटेलमध्ये डीके शिवकुमार यांना पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे.

कर्नाटकातील सत्ता संघर्षावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले,'कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजपा लोकशाहीचा खून करत आहे. भाजपने कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांना मुंबईत डांबून ठेवले आहे. महाराष्ट्रातील भाजपचे पदाधिकारीही खतपाणी घालत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही आमदारांना भेटू दिले जात नाही. हा घोडेबाजार लोकशाहीला धरून नाही.'

दरम्यान, बंडखोर आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी डीके शिवकुमार आज सकाळी मुंबईत दाखल झाले असून त्यांना भेटण्यास या आमदारांनी नकार दिला आहे. तसेच, मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा मागविली आहे. त्यामुळे पोलिसांकडून डीके शिवकुमार यांना हॉटेलमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे डीके शिवकुमार सकाळपासून हॉटेलच्या बाहेर थांबले आहे. त्यांच्यासोबत राज्यातील काँग्रेसचा एकही नेता सकाळपासून उपस्थित नव्हता. मात्र, दुपारी काँग्रेसचे मिलिंद देवरा आणि संजय निरुपम त्यांच्याकडे गेल्याचे समजते. 

याचबरोबर, डीके शिवकुमार हॉटेलजवळ आल्यानंतर भाजपा आणि जनता दलाचे (एस) नेते नारायण गौडा यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. याशिवाय, मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र या बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेतेची मागणी केली आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. 

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जनता दल (एस)च्या आमदारांनी राजीनामे देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.    

 

टॅग्स :धनंजय मुंडेकर्नाटक