Join us

मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 6:23 AM

मुंबई गद्दारांच्या, पक्ष चोरांच्या, बाप चोरांच्या हातात द्यायची की तुमच्या हाती ठेवायची, याचा निर्णय तुम्हाला २० मे रोजी घ्यायचा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी उद्धवसेनेचे मुंबई दक्षिण-मध्यचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारसभेत केला. 

त्याच वेळी एकीकडे घाटकोपर येथील होर्डिंग घटनेतील नातेवाईक शोक करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच भागात रोड शो करत संवेदना नसल्याचे दाखवून दिले, अशी खरमरीत टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी प्रभादेवी येथील खेडगल्लीत जाहीर सभा झाली. यावेळी पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, उद्धवसेनेचे सांगली येथील उमेदवार चंद्रहार पाटील, काँग्रेस, डाव्या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मुंबई गद्दारांच्या, पक्ष चोरांच्या, बाप चोरांच्या हातात द्यायची की तुमच्या हाती ठेवायची, याचा निर्णय तुम्हाला २० मे रोजी घ्यायचा आहे, असे ठाकरे म्हणाले. भाजपचा विचार हा महाराष्ट्राला तोडण्याचा आहे. मुंबईत मराठी माणसे राहणार नाहीत, अशी व्यवस्था करण्याचा भाजपचा विचार आहे, असाही आरोपही ठाकरे यांनी केला. 

ते आरोप करतात की, पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली. पुत्रीप्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली. मात्र, माझा थेट आरोप त्यांच्यावर आहे, त्यांच्या पुत्रप्रेमामुळे देश वर्ल्ड कप हरला. मुंबईत वर्ल्ड कपची फायनल झाली असती तर ती जिंकली असती, अशीही टीका ठाकरे यांनी केली. 

 

टॅग्स :आदित्य ठाकरेआदित्य ठाकरेमुंबईलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४