भाजपने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलेला नाही-देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 04:23 AM2020-08-16T04:23:24+5:302020-08-16T04:23:47+5:30

मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र प्रभारी पद अथवा अन्य जबाबदारीबाबत सांगितले नाही.

BJP has not demanded resignation of CM: Devendra Fadnavis | भाजपने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलेला नाही-देवेंद्र फडणवीस

भाजपने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलेला नाही-देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई : भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असे स्पष्ट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, पवार कुटुंबातील कलह आणि कोरोना संकटावर सविस्तर भाष्य केले. आगामी बिहार निवडणुकीत फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पुण्यातील पत्रकार परिषदेतील प्रश्नाला उत्तर देताना, मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र प्रभारी पद अथवा अन्य जबाबदारीबाबत सांगितले नाही.
बिहार निवडणुकांमुळे सुशांतसिंह प्रकरणावरून राजकारण होत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावला. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. मी पाच वर्षे राज्याच्या पोलिसांबरोबर काम केले. त्यांची क्षमता मला माहिती आहे. मात्र अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करू नये, अशी आमची अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.
सुशांत प्रकरण सीबीआयकडे पाठवण्याची मागणी झाली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल. मात्र महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्र पोलीस उत्तमच आहेत, असे फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे विश्लेषण करायची ही वेळ नाही. त्यांच्यात अंतर्गत मोठ्या प्रमाणात भांडण सुरू आहे. बदल्यांसंदर्भात जे ऐकायला मिळते ते भयंकर आहे. राज्याच्या डीजींनी चुकीच्या बदल्या करायला लावल्यास ते मी करणार नाही. वेळप्रसंगी नोकरी सोडतो, असे म्हटले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पवार कुटुंबीयांतील वादावर भाष्य करण्यास फडणवीस यांनी नकार दिला. पार्थ पवारांचा विषय पवार कुटुंबीयांचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्हाला पडायचे नाही, असे फडणवीस म्हणाले.
>महाराष्ट्र कोरोनाची राजधानी
देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी कोरोना संकटावरही भाष्य केले. कोरोना संकट सुरू होऊन पाच महिने होत आले. आपण आता लसीची वाट पाहतोय. कोरोनावर लस येईपर्यंत काळजी घ्यावी लागेल. महाराष्ट्र दुर्दैवाने कोरोनाची राजधानी झाली आहे. देशातील एकूण मृत्यूंपैकी ४० टक्के मृत्यू राज्यात होतात. मृत्युदर आणि बाधा रोखली तर आपण बाहेर पडू. कोरोना चाचणी वाढवण्याची गरज असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Web Title: BJP has not demanded resignation of CM: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.