Join us  

मनसेकडून सरकारवर हेरगिरीचा आरोप; साध्या वेशातील पोलिसांकडून बैठकीचे गुप्तपणे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 6:37 PM

मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या व्यक्तीने आपण रेल्वे गुप्तचर खात्यामध्ये कामाला असल्याची कबुली दिली.

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) शुक्रवारी भाजपा सरकारवर हेरगिरीचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शुक्रवारी राजगड येथे एक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर मनसेच्या नेत्यांची आपापसात बोलणी सुरू होती. त्यावेळी एक व्यक्ती मोबाईलवरून या सगळयाचे शुटिंग करत असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी हटकले असता त्याने सुरूवातीला आपण औरंगाबाद येथील अप्रेंटिस असल्याचे सांगितले. मात्र, तरीही मनसेच्या कार्यकर्त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी या व्यक्तीची अधिक चौकशी केली. तू अप्रेंटिस असला तरी बैठकीचे शुटिंग कशासाठी करत आहेस, असे विचारल्यानंतर या व्यक्तीची भंबेरी उडाली.या दरम्यान कार्यकर्त्यांनी त्याचा मोबाईलही ताब्यात घेऊन तपासायला सुरूवात केली. तेव्हा त्यामध्ये पत्रकार परिषदेचा व्हीडिओ आढळून आला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या व्यक्तीने आपण रेल्वे गुप्तचर खात्यामध्ये कामाला असल्याची कबुली दिली. आपले आडनाव जाधव असल्याचेही त्याने सांगितले. वरिष्ठांनी मला मनसेच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर  या पोलीस कर्मचाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोडून दिले. आम्ही याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, तेथील पोलिसही आमची तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :मनसेभाजपादेवेंद्र फडणवीस