भाजपाविरोधी नाराजीचा फायदा उठवत टीकटीक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 04:43 AM2019-03-24T04:43:12+5:302019-03-24T04:43:26+5:30

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघ असलेल्या मानखुर्द-शिवाजीनगरातील मध्यमवर्गीय आणि गरीब मराठी, दलित यासोबतच अल्पसंख्याक मतदारांच्या नाराजीचा फटका यावेळीही भाजपाला बसण्याची शक्यता आहे.

 The BJP is going to take advantage of anti-BJP resentment | भाजपाविरोधी नाराजीचा फायदा उठवत टीकटीक सुरू

भाजपाविरोधी नाराजीचा फायदा उठवत टीकटीक सुरू

Next

- मनीषा म्हात्रे

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघ असलेल्या मानखुर्द-शिवाजीनगरातील मध्यमवर्गीय आणि गरीब मराठी, दलित यासोबतच अल्पसंख्याक मतदारांच्या नाराजीचा फटका यावेळीही भाजपाला बसण्याची शक्यता आहे. मोदी लाट असतानाही मोदी फक्टर या भागात चाललेला नाही. त्यामुळे यंदाही भाजपाविरोधी याच नाराजीचा जास्तीतजास्त फायदा उठवण्याचा प्रयत्न कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सुरु केला आहे. येथील जनता आजही वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधापासून वंचित आहे.
मानखुर्द, गोवंडी हा मराठी तसेच मुस्लिमबहुल भाग आहे़ या भागात कामगार तसेच व्यापारीवर्ग राहतो. या ठिकाणी देवनार डंपिंग ग्राऊंड, देवनार पशुवधगृह, भाभा अणुसंशोधन केंद्र तसेच लहान-मोठय़ा कंपन्या आहेत. गेली १० वर्षे या भागात समाजवादी पार्टी, काँग्रेसचा दबदबा आहे. मात्र या विभागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. वाढती झोपडपट्टी, अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छ स्वच्छतागृह आणि डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न येथे आजही भेडसावत आहे. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड म्हणजेच जिजाबाई भोसले मार्ग़ाच्या एका बाजूला खाडी बुजवून वसलेल्या वस्त्यामध्ये मोठा मतदार आहे. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला गोवंडी स्टेशन, शताब्दी रुग्णालय आहे. रस्त्यामधे ना पूल आहे ना भुयारी मार्ग. पर्यायी रस्ता ओलाडून नागरिक ये-जा करतात. त्यामुळे अपघात वाढले. हार्बर लोकलने शिवाजीनगर आणि मानखुर्द हा भाग जोडला गेला असला तरीही गर्दीच्या वेळेत हार्बर लोकलमध्ये तोबा गर्दी असते.
जवळपास ९२ टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टयांमध्ये राहते. शिवाजीनगर, बैगनवाडी, मंडाळा, चिताकॅम्प, वाशीनाका आदी परिसरांमध्ये १९९५ नंतरच्या अनधिकृत झोपड्या, अधिकृत झोपडयांवर चढविण्यात आलेले मजले, यामुळे या भागांमध्ये अनधिकृत जलजोडण्यांबरोबरच पाणी खेचण्यासाठी बुस्टरपंप लावले जाते. त्यामुळे काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नव्हता.
परिणामी या भागांमध्ये पाणी चोरीला ऊत येऊन पाणीमाफियांतर्फे पाण्याची सर्रास विक्री होत होती. झोपडपट्टीदादा, भू माफिया, वीज चोरांचीही भर आहे. त्यांच्या विरुद्ध सर्वाधिक गुन्हे याच भागात दाखल होत आहेत.
२००९च्या विधानसभा निवडणुकीत सपाचे अबू आजमी ३८ हजार ४३५ मते मिळवून विजयी झाले. तर राष्ट्रवादी आणि मनसेचे इंजीन अनुक्रमे दुसऱ्या,तिसºया क्रमांकांवर फेकले गेले. तर २०१४च्या निवडणुकीत सपाचे अबू आजमी यांनी ४१हजार ७२० मतांनी सपाचा गड राखला. यात शिवसेनेचे सुरेश पाटील यांना ३१ हजार ७२८ तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला २७ हजार ४९४ मते होती.

राजकीय घडामोडी
मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या वेळी संजय पाटील यांचा नवाब मलिकांसोबतच वाद झाला. एका बैठकीत हा वाद विकोपाला जाऊन दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले. पाटलांनी यावेळी गोळीबार केल्याची बातमी व्हायरल झाली होती. अखेर पक्षातील वरिष्ठांनी मध्यस्थी करत दोघांची पुन्हा दिलजमाई करुन दिली.
पाटील यांनी आपल्या अ‍ॅक्टीव कार्यकर्त्यांच्या मदतीने या भागात आपली एक वोट बँक तयार केली आहे. मात्र नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांबाबत आंदोलने केल्यामूळे येथील बुहुसंख्य मतदारांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांच्या मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. यावेळी अशाप्रकारे मत विभागणी होऊ नये म्हणून पाटील यांनी कंबर कसली आहे.

Web Title:  The BJP is going to take advantage of anti-BJP resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.