Join us  

मुंबई भाजपा आदित्य ठाकरेंना टोला मारायला गेली, पण नसलेलं मंत्रिपद देऊन बसली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 1:46 PM

Cyclone Tauktae : वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला दिली होती भेट.

ठळक मुद्देवादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आपात्कालिन कक्षाला दिली होती भेट.भाजपनं केला आदित्य ठाकरे यांचा मुंबईचे पालकमंत्री असा उल्लेख

सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात तौक्ते वादळामुळे हाहाकार माजला होता. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. तर दुसरीकडे या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तोक्ते चक्रीवादळामुळे सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट दिली. परंतु या भेटीनंतर भाजपनं त्यांच्यावर टीका केली. परंतु टीका करत असताना भाजपला ते कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत याचा विसर पडला आणि त्याच्याकडे नसलेलं मंत्रिपद त्यांना दिलं."मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट दिली. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत मुंबईत पाण्याचे पाट वाहात असताना यांनी मात्र कॅमेऱ्यात पाहून आढावा घेतला. असा 'कार्यक्षम' पालकमंत्री लाभल्यानंतर मुंबईच्या वाताहातीला वादळ-वाऱ्याची गरजच काय?," असं म्हणत भाजपनं आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. परंतु यावेळी भाजपनं टीका करताना आदित्य ठाकरे यांचा मुंबई उपनगरचे पालकमंत्री असा उल्लेख करण्याऐवजी मुंबईचे पालकमंत्री असा उल्लेख केला.

भाजपच्या या ट्वीटनंतर काही नेटकऱ्यांनीही फिरकी घेत आदित्य ठाकरे हे मुंबईचे पालकमंत्री नसून मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आहेत असंही म्हटलं.

टॅग्स :तौत्के चक्रीवादळआदित्य ठाकरेशिवसेनाभाजपामुंबईमुंबई महानगरपालिका