Join us  

PMC बँकेतील संचालकांचं 'भाजपा कनेक्शन', खातेदारांना पैशाचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:40 PM

रणजीतसिंग हे पीएमसी बँकेचे सहसंचालक असून ते भाजपा आमदार सरदार तारासिंग यांचे सुपुत्र आहेत.

मुंबई - थकित कर्ज एका वर्षात 167 कोटीने वाढल्याने पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक अडचणीत आल्याने रिझर्व्ह बँकेने व्यवहारावर निर्बंध टाकले आहेत. बँकेचे थकित कर्ज 31 मार्च 2018 रोजी 148 कोटी व एकूण कर्जाच्या फक्त 1.05 टक्के होते. हेच थकित कर्ज 31 मार्च 2019 च्या ताळेबंदानुसार तब्बल 315 कोटींवर पोहचले आहे.  आरबीआयने बँकेवर निर्बंध लादल्यामुळे खातेदारांना पैशाचं टेन्शन आलं आहे. कारण, बँकेतील सभासदांना केवळ 1000 रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. आता, याप्रकरणात बँकेच्या संचालक मंडळातील 12 संचालकांपैकी अनेकांचे भाजपाशी जवळून कनेक्शन असल्याची माहिती पुढे आली आहे. 

रणजीत सिंग हे पीएमसी बँकेचे सहसंचालक असून ते भाजपा आमदार सरदार तारा सिंग यांचे सुपुत्र आहेत. तारासिंग हे मुलुंड मतदारसंघातून भाजपाचे 4 वेळा आमदार बनले आहेत. रणजीत हे स्वत: भाजपाचे सदस्य असून वडिलांच्या जागी यंदा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मी गेल्या 13 वर्षांपासून यंदाची तिसरी टर्म सहसंचालक बनलो आहे. ''मी बँकेच्या दैनिक कामकाजात जास्त सहभागी नसतो. त्यामुळे, कर्जवाटप प्रकरणाबद्दल मला अधिक माहिती नाही. आम्ही रिझर्व्ह बँकेकडे लवकरच निर्बंध उठविण्याची मागणी करणार आहोत. सध्या बँक नफ्यात असून 11,000 कोटी रुपयांचा भागभांडवल बँकेकडे असल्याचे सिंग यांनी म्हटले. तसेच, बँकेच्या खातेदारांनी त्रस्त होऊ नये,'' असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

आमदार तारासिंग यांनीही बँकेच्या दिवाळखोरीला किंवा कर्जवाटपाला संचालक जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. बँकेतील कर्जवाटपाचं काम हे तेथील व्यवस्थापकाच्या आदेशानुसार चालते, त्यामुळे संचालक मंडळाचा यात सहभाग नसल्याचे सिंग यांनी म्हटले. दरम्यान, काँग्रेसने बँकेच्या दिवाळखोरीला संचालक मंडळच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यातील बहुतांश संचालक हे भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचा आरोपही काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच खातेदारांच्या पैशाची जबाबदारी ही संचालकांचीच असल्याचेही निरुपम यांनी म्हटले. 

दरम्यान, पीएमसी बँकेच्या दिवाळीखोरीचं प्रमुख कारण म्हणजे बँकेकडून चुकीच्या पद्धतीने 2500 कोटी रुपयांच्या कर्जाची वाटप करण्यात आली. त्यामध्ये मुख्यत्वे बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांना हे कर्ज देण्यात आले आहे. हाऊसिंग डेव्हलपमेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हेच बँकेच्या दिवाळखोरीचे प्रमुख कारण असल्याची माहिती आहे. नियमानुसार बँकांना थकित कर्जाची पूर्ण तरतूद त्या वर्षीच्या नफ्यातून करावी लागते. पीएमसी बँकेला 2018-19 या वर्षात 244.46 कोटी ढोबळ नफा झाला. परंतु त्यातून 315 कोटींची तरतूद अशक्य असल्याने बँकेने फक्त 99 कोटींची तरतूद केली. 2019 च्या ताळेबंदाप्रमाणे बँकेजवळ 11600 कोटींच्या ठेवी (9300 कोटी मुदत व 2300 कोटी बचत ठेवी) आहेत. बँकेने 8383 कोटींचे कर्जवाटप केले. बँकेचे भाग भांडवल 292.61 कोटी व राखीव निधी 933 कोटी आहे. यावर्षी बँकेने आपली 105 कोटीची थकित कर्जे सीएफएम असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला विकल्याची चर्चा आहे. ती खरी असेल तर हा व्यवहार अत्यंत संशयास्पद आहे. 

टॅग्स :पीएमसी बँकभाजपामुलुंडआमदारबँक