Join us  

“सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले?”; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 10:09 AM

एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप ५ मध्ये आल्याबाबत भाजपने शंका उपस्थित केली आहे.

मुंबई: आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सध्या फारसे सक्रीय नसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कायम आहे. देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नावाचा समावेश झाला आहे. इंडिया टुडे माध्यम समूहाने केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. यावरून आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले, अशी विचारणा भाजपने केली आहे. 

इंडिया टुडेने प्रत्येक राज्यातील लोकांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी आहे, याबद्दल विचारणा केली. ४३ टक्क्यांहून अधिक मते मिळालेल्या ९ मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक प्रथम क्रमांकावर आहेत. पटनायक यांच्या कामावर ७१.१ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर ६१.८ टक्के लोक समाधानी आहेत, असे यात म्हटले आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

सव्वा दोन वर्षांत मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये कसे आले?

गेल्या सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे एकदाही मंत्रालयात आले नाहीत. मग कोणत्या निकषावर टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले? ते लोकांसठी गेल्या ८० ते ९० दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो, असा थेट सवाल पाटील यांनी केला आहे. 

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेंची भूमिका केल्याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी एक अभिनेता म्हणून करणे, यात मला काही गैर आहे, असे वाटत नाही. नथुराम गोडसेंच्या विचारांशी ते सहमत आहेत का ते त्यांनी जाहीर करावे. एक अभिनेता कुणाचीही भूमिका करू शकतो, असे पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपाचंद्रकांत पाटीलराजकारण